देशात काल दिवसभरात 16 हजार 862 कोरोनाबाधितांची नोंद, तर 379 जणांचा मृत्यू


नवी दिल्ली : देशभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत बुधवारच्या तुलनेत गुरुवारी काही अंशी घसरण झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान काल दिवसभरात देशात 16 हजार 862 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे, तर 379 नागरिकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. तर काल दिवसभरात 19 हजार 391 नागरिकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

देशातील कोरोना लसीकरण मोहिमेने चांगलाच वेग पकडला असून लसीकरणाचा प्रवास आता 100 कोटीच्या दिशेने सुरु झाला आहे. आतापर्यंत देशात कोरोना प्रतिबंधक लसीचे 97 कोटी 14 लाख 38 हजार 553 डोस देण्यात आले आहेत. देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दोन लाख तीन हजार 678 एवढी झाली आहे, तर आतापर्यंत चार लाख 51 हजार 814 लोकांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात राज्यात 2 हजार 384 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 35 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 हजार 343 बाधित कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 13 हजार 418 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97.38 टक्के आहे. तर राज्याचा डेथ रेट 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 8, 296 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.