बँक ऑफ इंग्लंडच्या डेप्युटी गव्हर्नरांनी वर्तवली बिटकॉईन आणि इतर क्रिप्टोकरन्सीमुळे आर्थिक संकट येण्याची शक्यता


नवी दिल्ली : बँक ऑफ इंग्लंडचे डेप्युटी गव्हर्नर सर जॉन कन्लिफ यांनी बिटकॉईन आणि इतर क्रिप्टोकरन्सीमुळे येणाऱ्या काळात आर्थिक संकट येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली आहे. याबाबतचे वृत्त डेली मेलने दिले आहे. जागतिक आर्थिक संकटाच्या स्वरुपात येत्या काळात बिटकॉईन आणि इतर क्रिप्टोकरन्सीच्या किंमती घसरतील आणि त्याचा परिणाम होईल, असेही ते म्हणाले.

डेप्युटी गव्हर्नर सर जॉन कन्लिफ यांनी पुढे सांगितले की, बिटकॉईन आणि इतर क्रिप्टोकरन्सीच्या किंमती या घसरतील, त्या अगदी शून्यापर्यंत येण्याची शक्यता असल्यामुळे जगभरातील अर्थव्यवस्थावंर याचा परिणाम होऊन आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. बिटकॉईन आणि इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये ज्या संस्थांनी गुंतवणूक केली आहे, त्यांच्याबाबतीत आताच काही अंदाज वर्तवण्यात येणार नाही, पण याचा सर्वाधिक तोटा हा वैयक्तिक गुंतवणूकदारांना होणार आहे.

1.7 ट्रिलियन डॉलर्स एवढे मोठे सध्याचे क्रिप्टोमार्केट आहे. अमेरिकेतील 2008 साली झालेल्या सबप्राईम क्रायसिसपेक्षा हे मार्केट कितीतरी मोठे असल्याचे सर जॉन कन्लिफ यांनी सांगितल्यामुळे भविष्यातील मोठा धोका लक्षात घेता या क्रिप्टोकरन्सीवर लवकरात लवकर नियंत्रण आणावे, असंही त्यांनी सांगितले. या वर्षी क्रिप्टोकरन्सीच्या मार्केटच्या मूल्यामध्ये 200 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

अमेरिकेची फेडरल रिझर्व बँकेनंतर जगातील सर्वाधिक सुरक्षित अशी दुसऱ्या क्रमांकाची बँक म्हणून ब्रिटनच्या ‘बँक ऑफ इंग्लंड’चा नंबर लागतो. ‘झिरो रिस्क असेट्स’ असे या बँकातील ठेवींना समजले जाते, त्या सुरक्षित असतात. त्यामुळे जगभरातील अनेक देशांच्या सोन्याच्या ठेवी या बँक ऑफ इंग्लंडमध्ये ठेवण्यात आल्यामुळे या बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरांनी दिलेल्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.