भगवान बाबांची मान खाली जाईल अशा कुठल्या प्रवृत्तीचाही मला उल्लेख करायचा नाही : पंकजा मुंडे


सावरगाव : सावरगावमधील भगवान भक्तीगडावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता. प्रशासनाने या मेळाव्याला नियम आणि अटींसह परवानगी दिली आहे. पंकजा मुंडे यांनी या मेळाव्यात बोलताना उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले. आजचा सोहळा खूप देखणा आहे, असा सोहळा देशात कुठे होत नसेल, असे पंकजा म्हणाल्या. भगवानगडावर पंकजा मुंडे हेलिकॉप्टरने दाखल झाल्या होत्या. त्या याबाबत बोलताना म्हणाल्या की, मी हेलिकॉप्टरमधून भगवान बाबांवर फुले टाकत होते. तसेच, तुमच्या पायावरही मी फुले टाकत होते. मी फुले कोणत्या नेत्याची चमचेगिरी करण्यासाठी टाकत नव्हते, तर भगवान बाबांसाठी आणि तुमच्यासाठी वाहत होते, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, दसऱ्याची आजची भक्ती आणि शक्तीची, जी परंपरा कायम ठेवण्यासाठी तुम्ही घरची पुरणपोळी सोडून येथे आले असल्याचे म्हणत पंकजा मुंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, जिथे आपण जन्म घेतला त्या मातीचा, जातीचा आपल्याला कधी कमीपणा वाटू देऊ नका, अशी गोपीनाथ मुंडेंची शिकवण आहे. राजघराणे असो किंवा वंचितांमध्ये जन्म झालेला असो लाज वाटली नाही पाहिजे. महाराष्ट्राची आज जी परिस्थिती आहे, त्यासाठी ही परंपरा उभी केली आहे. कोणत्या पक्षाचे, मतांचे राजकारण नाही, तर सामान्यांची चळवळ येथून उठत आहे, जी राज्याच्या कानाकोपऱ्यात जाते, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, सर्वांचे लक्ष मी काय बोलणार याकडे आहे. मुंडे साहेबांची किर्ती आणि भगवानबाबांची मूर्ती माझ्यामागे आहे. हे अत्यंत पवित्र स्थान आहे. या स्थानावर उच्चार करायचा नाही, असा कुठलाही शब्द मी उच्चारणार नाही. ज्या व्यक्तीचा उल्लेख या स्थानावर केल्याने भगवान बाबांची मान खाली जाईल, अशा कुठल्याही व्यक्तीचा मला उल्लेख करायचा नाही. अशा कुठल्या प्रवृत्तीचाही मला उल्लेख करायचा नाही.