शरद पवारांच्या त्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी


मुंबई – देवेंद फडणवीसांच्या अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघाले आहे. फडणवीसांवर यावरून अनेकांनी शेलक्या शब्दात टीकाही केली आहे. याच दरम्यान राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही मी चार वर्ष मी मुख्यमंत्री होतो, पण माझ्या लक्षात कधी राहिलेही नाही. ही आमची कमतरता असल्याची प्रतिक्रिया फडणवीसांच्या वक्तव्यासंदर्भात दिली होती. त्यावर शरद पवार मोठे नेते, मोठ्यांना जास्त उत्तरे द्यायची नसतात अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यांनी गोव्यामध्ये होणाऱ्या आगामी निवडणुकासंदर्भात बोलताना एबीपी माझाला यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

भाजपला गोव्यामध्ये प्रचंड मान्यता आहे. येथे मनोहर पर्रिकरांची परंपरा आहे आणि मुख्यमंत्र्यांनी देखील चांगले काम केले आहे. तसेच देशामध्ये मोदींबद्दल असलेली सकारात्मकता या सर्व गोष्टी एकत्र केल्यानंतर गोव्यामध्ये आम्हाला विजय मिळेल, असा मला विश्वास आहे. यावेळी आमची पूर्ण बहुमताची तयारी आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला बहुमत मिळेल आणि त्यासाठी आम्ही गेले काही दिवस तयारी करत असल्याचे फडणवीस म्हणाले.

विरोधी पक्षनेता म्हणून मी गेल्या दोन वर्षामध्ये सातत्याने महाराष्ट्र उभा आडवा सगळा पिंजून काढला आहे. कोरोनामध्ये जेव्हा घरातून कोणी बाहेर पडत नव्हते, तेव्हा मी मैदानात होतो. पूर, अतिवृष्टी, चक्रीवादळ अशावेळीही आम्ही लोकांमध्ये होतो. त्यामुळे सत्ता ज्यांना मिळवायची होती, त्यांनी ती कशीही मिळवली. आता त्यावर लक्ष घालण्यापेक्षा ते ज्या प्रकारे सरकार चालवत आहेत आणि ज्याप्रकारे लोकांचा रोष आहे, तो संघटित करण्याचे काम आम्ही करत असल्याचेही फडणवीस म्हणाले.

तुम्हाला मुख्यमंत्री पद मिळाले नाही याची वेदना शरद पवारांना सलत आहे, असा प्रश्न विचारल्यानंतर फडणवीसांनी याबाबत भाष्य केले. शरद पवार हे मोठे असल्यामुळे मोठ्यांना जास्त उत्तरे द्यायची नसतात. आपण असेही म्हणू शकतो की, पंतप्रधान पद त्यांना मिळाले नाही, त्याची वेदना त्यांच्या मनात सलत आहे. या सगळ्या गोष्टी राजकारणात बोलाव्या लागतात. तुम्हाला तुमच्या विरोधकांना उत्तरे द्यावी लागतात. सत्ता आम्हाला मिळाली पाहिजे हे कुठल्याही पक्षाला वाटते, पण आम्ही हातपाय गाळून बसलेलो नाही. विरोधी पक्षाचे उत्तम काम करत आहोत, आम्हाला काही चिंता नसल्याचे फडणवीस म्हणाले. आगामी पालिका निवडणुकांमध्ये स्वबळावर लढणार असल्याचे यावेळी फडणवीसांनी सांगितले. महाराष्ट्रामध्ये भाजप मित्रपक्षांना घेऊन पूर्ण ताकदीने या निवडणुकांमध्ये उतरु असे फडणवीसांनी सांगितले. त्याचबरोबर तुम्हाला आमचे मित्र माहित आहेत. मनसेसोबत कुठलीही युती झालेली नाही. बाळा नांदगावकर युतीची बोलणी करण्यासाठी आले नव्हते. ते काही वैयक्तिक विषयांवर चर्चा करण्यासाठी आल्याचेही फडणवीस म्हणाले.

अतिवृष्टीनंतर मराठवाड्यामध्ये करण्यात आलेल्या मदतीच्या घोषणेवरही देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केले. सरकारला माझा सवाल आहे की मागे जी मदत केली होती, ती तरी पोहोचली का याचा आढावा घ्यावा. मागचीही मदत पोहोचली नाही, ही मदत सुद्धा पोहोचणार नाही. आकडेवारी फेकायची याच्या पलिकडे हे सरकार काही करत नाही. राज्य सरकारने विम्याचे पैसे भरले नाहीत म्हणून शेतकऱ्यांना ते मिळाले नाहीत. कुणाला चिंता नाही. येथे सगळेच मुख्यमंत्री आहेत. आपापल्या खात्यावर सगळे मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत. प्रत्येक पक्षात मुख्यमंत्री असल्याचे फडणवीस म्हणाले.

केंद्रीय यंत्रणांचा वापर महाराष्ट्र सरकारला कमकुवत करण्यासाठी होत असल्याच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. उच्च न्यायालयाने सीबीआयला अनिल देशमुखांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या सरकारने सीबीआयला अडवून ठेवले. चोऱ्या माऱ्या केल्या तरी सीबीआय येऊ देणार नाही अशी यांची भूमिका आहे. १००० कोटींच्या दलालीचे आरोप होत असतील, तर केंद्र सरकारने गप्प बसायचे का? मराठवाड्यातील शेतकऱ्याला द्यायला तुमच्याकडे एक रुपया नाही आणि हजारो कोटींची दलाली सुरु आहे आणि त्यावर कारवाई करु नये, असे कसे चालेल. ही नियमानुसार होणारी कारवाई आहे. याच्यामध्ये काही चेहरे उघड होत आहे, म्हणून हा कांगावा करण्यात येत असल्याचे फडणवीस म्हणाले.

ते किरीट सोमय्यांच्या एकाही आरोपाला उत्तर देऊ शकलेले नाहीत. त्यांची विश्वसनीयता किती आहे हा सवाल आता आहे. सोमय्या रोज आरोप लावतात त्यातील एकाही आरोपाला ते उत्तर देऊ शकले नाहीत. सोमय्या पुरावे घेऊन बोलत असतील तर त्यांना नाकारता येणार नसल्याचे फडणवीस म्हणाले.