मुंबई – चंद्रपूर येथील रामाळा तलावाच्या खोलीकरण आणि स्वच्छतेच्या कामांना गती देऊन पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी परिसर विकसित करण्याचे निर्देश पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले.
चंद्रपूरमधील रामाळा तलावाचे खोलीकरण आणि स्वच्छतेच्या कामांना गती द्या – पर्यावरण मंत्र्यांचे निर्देश
रामाळा हा ऐतिहासिक तलाव प्रदूषणमुक्त करणे तसेच त्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करणे याबाबत श्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. यावेळी पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, पर्यटन संचालक मिलिंद बोरीकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे, पर्यावरणवादी बंडू धोत्रे उपस्थित होते. तर नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, चंद्रपूर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते आदी ऑनलाईन उपस्थित होते.
रामाळा तलावाच्या खोलीकरणाच्या निविदा प्रक्रियेस सुरूवात झाली आहे. त्याचबरोबर तलावातील गाळ काढणे, तलावाची स्वच्छता करण्याचे निर्देश ठाकरे यांनी दिले. आजूबाजूचे घाण पाणी तलावात येऊन तलावाचे पाणी तसेच परिसरातील जलस्रोत प्रदूषित होऊ शकतात त्यामुळे असे मार्ग बंद करून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम सुरू करावे, असेही त्यांनी सांगितले. तलाव परिसरात अतिक्रमण होऊ नये यासाठी संरक्षक भिंत बांधण्याची आवश्यकता असून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हा परिसर विकसित करावा, असे निर्देश ठाकरे यांनी दिले.