केंद्र सरकारकडून काही संस्थांचा सातत्याने गैर वापर; शरद पवारांचा हल्लाबोल


मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केंद्राकडून तपास यंत्रणांचा सतत गैरवापर होत असल्याची टीका केली आहे. अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे पोलिस अधिकारी कुठे असल्याचा सवालही त्यांनी केला. पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की, सर्व राजकीय पक्षांच्या सहकाऱ्यांनी एकत्र बसायला हवे. राजनाथ सिंह यांनी आम्हाला 6 महिन्यांपूर्वी बोलावले होते. त्या बैठकीत भारत चीन बॉर्डरवर नेमकं काय सुरू आहे याबाबत आम्हाला सांगितले होते. शरद पवार केंद्रावर टीका करताना म्हणाले की, जम्मू काश्मिरमध्ये पाच जवान दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले. तर दुसरीकडे 13 वेळा बैठका चीनसोबत घेण्यात आल्या, पण एकही बैठक यशस्वी झाली नाही.

पवार पुढे म्हणाले की, जे जवान काल शहीद झाले अशाप्रकारे मागच्या काही दिवसांत सातत्याने असे प्रकार घडत आहेत. त्यासाठी इतर पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन बोलायला हवे. काही संस्थांचा केंद्र सरकार सातत्याने गैर वापर करत आहे. यामध्ये सीबीआय, ईडी, एनसीबी आशा संस्थांचा वापर करत आहे. काही उदाहरणे सांगायचे झाले, तर अनिल देशमुख यांचे उदाहरण घेता येईल.

देशमुख यांच्याबाबत मागच्या पोलीस आयुक्तांनी काही आरोप केले आणि त्यामुळे अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. ज्यांनी ते आरोप केले ते लोक आता कुठे आहेत हेच माहिती नाही. महाविकास आघाडी सरकारला ईडी, सीबीआयच्या माध्यमातून बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे म्हणाले. पवार पुढे म्हणाले की, एक जबाबदार अधिकारी याबाबत आरोप करतो आहे. हे लक्षात आल्यानंतर तात्काळ राजीनामा दिला, पण दुसरा व्यक्ती मात्र गायब झाला आहे. सध्या आपल्याला हा फरक पाहायला मिळत आहे. अनिल देशमुख यांच्याबाबतची चौकशी सध्या सुरू आहे. त्यांच्या घरी काल 5 वेळा छापे मारी केली. त्यांना तिथे नेमके काय मिळत आहे हेच कळत नाही. जनतेने देखील याबाबत विचार करायला हवा, असे पवार म्हणाले.

पवार म्हणाले की, मागच्या काही दिवसांपूर्वी लखीमपुर हिंसाचाराची घटना घडली. सुदैवाने ती घटना मीडियामुळे बाहेर आली. या घटनेत शेतकऱ्यांची हत्या करण्यात आली, यामध्ये एका पत्रकाराचा देखील समावेश होता. असे या आधी कधी झाले नव्हते. त्यामध्ये एक बाब समोर आली की केंद्रीय गृह राज्यमंत्री यांच्या चिरंजीवांचा त्यामध्ये समावेश होता. जवळपास 6 दिवसांनंतर सर्वोच्च न्यायालयाने यावर भाष्य केले आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे तोपर्यंत त्या व्यक्तीचा घटनेमध्ये सहभाग नसल्याचे त्यांच्या पक्षांकडून सांगण्यात येत होते. जरी त्यांचा व्यक्ती असला तरी त्यांनी लगेचच कारवाई करण्यात यायला हवी. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना या घटनेची आपली जबाबदारी टाळता येणार नाही त्यामुळे त्यांनी तात्काळ पदावरून मुक्त व्हावे, असे ते म्हणाले.

शरद पवार मावळ घटनेसंदर्भात होत असलेल्या आरोपांवरुन म्हणाले की, मावळमध्ये काय झाले, असा आरोप भाजपने केला. त्यांना मला एवढेच सांगायचे आहे. त्यावेळी शेतकरी मृत्यूमुखी पडले, त्याला जबाबदार राजकीय पक्ष किंवा नेते नव्हते. त्यावेळी आरोप पोलिसांवर होते. लखीमपूर घटनेशी माजी गृहमंत्री यांनी तुलना केली. परंतु हे लक्षात घ्यावे की मावळ घटनेवरून लोकांना हे माहीत झाले की या घटनेला सरकार जबाबदार नव्हते तर स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रोत्साहन दिले होते हे स्पष्ट झाले असल्याचे ते म्हणाले. ज्यावेळी लोकांना मावळच्या घटनेबाबत कळले त्यानंतर हे स्पष्ट झाले की याला सरकार जबाबदार नव्हते. त्यामुळेच मावळमध्ये राष्ट्रवादीचे आमदार 90 हजार मतांनी निवडून आले असल्याचे शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रात पुढील 15 दिवसांत साखर कारखाने सुरू होतील. काही लोकांनी अशी सुरुवात केली आहे की, उसाचे पैसे आम्हाला तुकड्या तुकड्यात देऊ नका, आम्हाला एक रक्कमी पैसे द्या. त्यामुळे ज्या कारखान्याची पैसे द्यायची ऐपत नाही, त्यांनी पैसे द्यायचे कसे? त्यामुळे मुंबईतुन ज्याप्रकारे कापड गिरण्या गायब झाल्या तशा प्रकारची परिस्थिती कारखान्यांच्या बाबत होऊ नये, असे ते म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, मी अजित पवार यांचे भाष्य ऐकले. ते बोलले की मी अर्थमंत्री आहे. कर चोरी आम्ही करत नाही. कारण मंत्री म्हणून मला याबाबत माहिती आहे. आमच्या घरी मागच्या 6 दिवसांपासून पाहुणे आले आहेत. पाहुणचार किती घ्यावा याला देखील प्रमाण आहे. पाहुणचार घ्यावा, परंतु अजीर्ण होईल एवढा घेऊ नये. अजूनही काही ठिकाणी अजूनही ते अधिकारी आहेत. मी आमच्या घरी चौकशी केली, त्यावेळी एक लक्षात आले की एका घरामध्ये 18 अधिकारी आले होते. आमच्या घरातील दोघे जण होते, परंतु त्यांच्या घरी 18 जण येऊन थांबले होते. आता ही छोटी घरे आहेत, यामध्ये कसे ऍडजस्ट करायचे, हे त्यांना कळायला हवे होते, असा टोलाही त्यांनी लगावला.