‘उत्सव गणेशाचा, जागर मताधिकाराचा’ या गणेशोत्सव सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर


मुंबई : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांमध्ये मतदानासंदर्भात जनजागृती व्हावी या उद्देशाने घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक पुण्याचे रविंद्र भुजबळ, कोल्हापूरचे अक्षत पाटील तर पुण्याचे रोहिदास तुपसौंदर यांना तर 11 उत्तेजनार्थ पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उत्सव गणेशाचा, जागर मताधिकाराचा’ या विषयावर 10 सप्टेंबर 2021 ते 19 सप्टेंबर 2021 या कालावधीत ‘घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या परीक्षणाचे काम व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर आणि मुक्त पत्रकार प्रथमेश राणे आणि स्वीप कार्यक्रमाचे सल्लागार दिलीप शिंदे यांनी पाहिले.

या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध भागांतून एकूण 360 स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत पुणे येथील रवींद्र भूजबळ यांना प्रथम पारितोषिक, कोल्हापूर येथील अक्षत पाटील यांना द्वितीय पारितोषिक, तर पुणे येथील रोहिदास तुपसौंदर यांना तृतीय पारितोषिक घोषित करण्यात आले आहे. प्रवीण पाटील (जळगाव), आर्यन जोशी (भुसावळ), नेमाबाई शिंदे (पंढरपूर), संतोष माहिते (सांगली), रमेश धुमाळ (रायगड), वसंतराव देशमुख (बुलडाणा), नवनाथ इथापे (मुंबई), संतोष जोशी (जालना), सुनील तवर (धुळे), जयश्री साठे (लातुर), हनमंत भोसले (मुंबई), या 11 स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर करण्यात आले आहेत.

या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 21 हजार रुपये, 11 हजार रुपये आणि 5 हजार रुपये, तसेच मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त अकरा विजेत्यांना प्रत्येकी एक हजार रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात येईल.

मताधिकार हा 18 वर्षांवरील प्रत्येक नागरिकाचा कायदेशीर अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नाव मतदार यादीत नोंदविणे आणि मताधिकार बजावणे आवश्यक आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी अभिनव कल्पना राबविणे, मताधिकार बजावताना जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे या सर्व बाबींचा या स्पर्धेत विचार करण्यात आला होता.