“पूर्ण लसीकरण”च्या व्याख्येत सुधारणा


मुंबई : “पूर्ण लसीकरण” झालेल्या व्यक्तींच्या व्याख्येत राज्य शासनातर्फे सुधारणा करण्यात आली असून यात 18 वर्षाखालील व्यक्ती तसेच वैद्यकीय कारणामुळे लस न घेऊ शकणाऱ्या व्यक्तींचाही समावेश करण्यात आला आहे.

राज्य शासनामार्फत जारी आदेशात म्हटले आहे की, लॉकडाऊननंतर टप्प्याटप्प्याने विविध सेवा प्रदाता तसेच सेवा प्राप्त करणारे यांच्यासाठी कामाची परवानगी देण्यात आली असून त्यांचे पूर्णपणे लसीकरण झालेले असणे बंधनकारक आहे. सद्यस्थितीत पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तीच्या व्याख्येमध्ये अशा लोकांचा समावेश होतो की ज्यांनी भारत सरकारद्वारे निर्देशित दोन्ही लशी ठराविक कालांतराने घेतलेल्या आहेत आणि दुसरी लस घेऊन त्यांना चौदा दिवस लोटले आहे.

परंतु असे निदर्शनास आले आहे की, अनेक प्रदाते व सेवा घेणाऱ्या लोकांची इच्छा असताना सुद्धा वैद्यकीय कारणामुळे किंवा त्यांचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी असल्यामुळे ते लस घेऊ शकत नाही. अशा नागरिकांना ही सेवा देण्याची किंवा सेवा प्राप्त करण्याची परवानगी देणे गरजेचे आहे. त्यानुसार लसीकरण झालेल्या लोकांच्या व्याख्येत सुधारणा करण्यात आली आहे. यानुसार खालील तीन वर्गातल्या व्यक्तींना “पूर्ण लसीकरण” झालेले व्यक्ती म्हणून गृहीत धरले जाईल:-

  • अशी व्यक्ती की ज्याने लसीचे दोन्ही डोस घेतले आहे आणि दुसरा डोस घेऊन १४ दिवस झालेले असतील.
  • कोणतीही अशी ज्या व्यक्तीला वैद्यकीय कारणांमुळे लस घेणे शक्य नसेल आणि मान्यता प्राप्त डॉक्टराकडून त्यांनी अशा प्रकारचे प्रमाणपत्र मिळविले असेल.
  • जर एखादी व्यक्ती 18 वर्षांपेक्षा कमी वयाची असेल.

भविष्यात जर या वयोगटासाठी लस उपलब्ध केली गेली तर लस उपलब्धतेच्या नंतरही ६० दिवसांसाठी ही सुधारणा अमलात राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.