मुंबई : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा -२ अंतर्गत सन २०२१ २२ या वर्षात केंद्र स्तरावरुन राज्यात ३४ जिल्ह्यातील ९१२ गावात स्वच्छ सर्वेक्षण, २०२१ केले जाणार आहे. यावर्षीही स्वच्छ भारत सर्वेक्षणात महाराष्ट्र अग्रेसर राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
स्वच्छ भारत सर्वेक्षणात महाराष्ट्र अग्रेसर राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत – गुलाबराव पाटील
मंत्रालयात स्वच्छ भारत ग्रामीण सर्व्हेक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. यावेळी पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, पाणी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव संजय चहांदे, प्रकल्प संचालक रवींद्र शिंदे, जिल्हा स्तरावरून सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पाणीपुरवठा मंत्री पाटील म्हणाले, स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१९ मध्ये राज्याला स्वच्छ राज्य म्हणून गौरविण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्र आतापर्यंत पुढे आहे. महाराष्ट्र नेहमी पुढे राहून प्रथम क्रमांकावर असावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. २ ऑक्टोबर, २०२१ पर्यंत राज्यातील ७७५ गावे हागणदारीमुक्त अधिक शौचालययुक्त (ODF+) घोषित करण्यात आली आहेत. मार्च, २०२२ पर्यंत एकूण १९,६२४ गावे हागणदारीमुक्त अधिक (ODF+) घोषित करावयाची आहेत. त्यासाठी नियोजन करावे.
जून २०२० नंतर केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर जिल्हा स्तरावरुन एकूण ४३६८ सार्वजनिक/सामुदायिक शौचालयांकरिता नोंदणी करण्यात आलेली असून त्यापैकी २४८५ शौचालयांची बांधकामे पूर्ण झालेली आहेत. तर उर्वरीत कामे प्रगतीपथावर आहेत.असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
राज्यस्तरावरुन दि. १५ जून, २०२१ रोजी ग्रामीण भागात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी कृती आराखडे तयार करण्याकरिता ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात आले होते. त्यानंतर घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनांतर्गत राज्यातील एकूण ९९७१ गावांचे प्रारुप आराखडे तयार करण्यात आले आहेत. उर्वरीत आराखडे लवकर तयार करावेत, अशा सूचनाही पाटील यांनी यावेळी दिल्या.