२० ऑक्टोबरपासून सुरू होणार राज्यातील महाविद्यालये


मुंबई – ४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू झाल्यानंतर महाविद्यालये कधी सुरू होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. कोरोनामुळे दीर्घकाळापासून राज्यातील बंद असलेली महाविद्यालये अखेर लवकरच सुरू होत आहेत. पण विद्यार्थी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना यासाठी काही नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. याबाबतची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

उदय सामंत यावेळी बोलताना म्हणाले, राज्यातील २० ऑक्टोबरपासून कॉलेज सुरु होणार आहेत. पण विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक असणार आहे. याबद्दल माध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले, महाविद्यालये सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी नियमावली असणार आहे. त्या त्या जिल्ह्यातली परिस्थिती पाहून हे ठरवले जाईल. ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेले नाही अथवा एकच डोस झालेला आहे, त्यांच्यासाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सामंत पुढे म्हणाले, कॉलेजमध्ये ज्या विद्यार्थ्यांना हजर राहता येणार नाही, त्यांची ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था कॉलेजने करावी. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता महाविद्यालय सुरू ठेवायची का? हा निर्णय घेण्याचे अधिकार सर्वस्वी स्थानिक प्राधिकरणाला असतील. डोस पूर्ण झाले नसतील तर महाविद्यालयांनी कॅम्प घेत लसीकरण करावे अश्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर वसतिगृहेसुद्धा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे निर्देश विद्यापीठांना देण्यात आले आहेत.