ठरलं! या ठिकाणी होणार शिवसेनेचा दसरा मेळावा


मुंबई : अखेर तमाम शिवसैनिकाचे लक्ष लागून राहिलेल्या दसरा मेळाव्याचे ठिकाण ठरले असून, गेल्यावर्षी प्रमाणे हॉलमध्येच यंदाचा दसरा मेळावा हा पार पडणार आहे. गेल्यावर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात दसरा मेळावा पार पडला होता. पण यंदा षण्मुखानंद सभागृहात दसरा मेळावा पार पडणार आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात पार पडणार असून, 50 टक्के उपस्थितीत दसरा मेळावा पार पडणार आहे. शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते उपनेते, मंत्री, मुंबईचे आमदार, महापौर आणि मुंबई महानगरपालिकेतील काही महत्वाचे नगरसेवक या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. राज्यात कोरोनाचे संकट अद्यापही संपलेले नसल्यामुळे शिवाजी पार्क ऐवजी शिवसेनेने यंदाही दसरा मेळावा हॉलमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाचे संकट ओसरु लागल्यामुळे यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने पार पडणार नाही. तो नियम आणि संकेत पाळून कशा पद्धतीने साजरा करता येईल, याचे नियोजन सुरु आहे. मुख्यमंत्र्यांचीही तशी इच्छा असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले होते.