स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांचा पेन्शन देण्यासाठी शोध घ्या; मुंबई उच्च न्यायालयाची सूचना


मुंबई – मुंबई उच्च न्यायालयात स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबीयांसाठी पेन्शन योजनेसंदर्भात सुनावणी पार पडली. देशासाठी ज्यांनी आपल्या जीवनाचा सर्वोत्तम काळ दिला, त्यांना मदत आणि सन्मान देण्यासाठी ही पेन्शन योजना सुरू करण्यात आली होती. पण, महाराष्ट्र सरकारने त्यांचे पेन्शनचे दावे कागदपत्रांच्या अभावामुळे किंवा उशीरा केलेल्या अर्जांमुळे नाकारणे, या स्वातंत्र्य सैनिकांसोबतचा हा दुर्व्यवहार होता, अशा शब्दांत न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले आहे. खर तर सरकारने स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना अर्ज करायला लावण्याऐवजी त्यांचा शोध घ्यावा आणि पेन्शन घेऊन त्यांच्याकडे जावे. हाच ही योजना राबवण्याचा खरा हेतू असेल, असेही न्यायालयाने म्हटले.

न्यायमूर्ती उज्जल भुयान आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठात ७ ऑक्टोबर रोजी स्वातंत्र्यसैनिकांची पत्नी शालिनी लक्ष्मण चव्हाण (९०) यांच्या याचिकेवर सुनावणी पार पडली. शालिनी यांचे पती दिवंगत लक्ष्मण रामचंद्र चव्हाण हे स्वातंत्र्यसैनिक होते आणि त्यांनी भारत छोडो आंदोलनात भाग घेतला होता. १९४२मध्ये या आंदोलनातील सहभागासाठी त्यांना १८ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा झाली. ते सुरुवातीला ठाणे कारागृहात होते आणि नंतर एप्रिल १९४४ मध्ये त्यांना भायखळा कारागृहात ठेवण्यात आले होते.

शालिनी चव्हाण यांनी याचिकेत म्हटले आहे की, स्वातंत्र्य सैनिकांसाठी महाराष्ट्र राज्याने पेन्शन योजना तयार केली आहे, ज्याला स्वातंत्र्य सेनानी निवृत्तीवेतन योजना, १९७२ म्हटले जाते. परंतु त्यांच्या पतीचे १९६५ मध्ये निधन होऊनही या योजनेचा लाभ त्यांना मिळाला नाही. दरम्यान, काही काळाने त्यांच्या एकुलत्या एक मुलाचा देखील मृत्यू झाल्याचे त्यांनी याचिकेत सांगितले होते. पेन्शन नाकारण्याचे कारण म्हणजे भायखळा जिल्हा कारागृहातील जुने रेकॉर्ड ज्यात चव्हाण यांच्या सहा महिन्यांच्या कारावासाचे तपशील आहेत ते नष्ट झाले असावेत, असे याचिकाकर्त्याचे वकील जितेंद्र एम पठाडे आणि श्रीकांत रावकर यांनी न्यायालयात सांगितले. दरम्यान, न्यायालयाने या महिलेल्या वयाच्या ९०व्या वर्षी पेन्शन योजनेचा लाभ देण्याचे आदेश दिले आहेत.

स्वातंत्र्य सेनानीच्या विधवेला मदत करण्याचा आदेश न्यायालयाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगडच्या सचिवांना दिला आहे. या महिलेला तिच्या पतीच्या तुरुंगात असतानाचा दाखला पुरावा म्हणून सादर न करता आल्यामुळे पेन्शन नाकारण्यात आले होते. तसेच तिच्या याचिकेच्या निकालाच्या अधीन राहून न्यायालयाने राज्य सरकारला या वर्षी ऑक्टोबरपासून त्या विधवेला पेन्शन देण्याचे निर्देश दिले. ही महिला १९९३ सालापासून तिच्या केसचा पाठपुरावा करत होती, असं तिने न्यायालयात सांगितले.