सीटी स्कॅन सुविधेचा लाभ गरीब आणि गरजू रुग्णांना व्हावा – अजित पवार


बारामती : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय बारामती येथील सिटी स्कॅन सुविधेचा लाभ गरीब आणि गरजू रुग्णांना व्हावा आणि रुग्णांना उत्तम आरोग्य सुविधा देण्यात याव्यात, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ‘डॉक्टर फॉर यू’ आणि उद्योग संस्थांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून रुपये 1 कोटी 75 लाख खर्च करून बसविण्यात आलेल्या सीटी स्कॅन मशीनचे लोकापर्ण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाला नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, ‘डॉक्टरर्स फॉर यू’ चे अध्यक्ष डॉ. रजत जैन, सचिव साकेत झा, बोइंग इंडियाच्या प्रवीणा भट, इंडिया लिड हेल्थ ॲण्ड वेलनेस वॉलमार्ट ग्लोबल सोर्सिंगचे हेमंत अग्रहारी, फ्लिपकार्टचे संचालक डिप्पी वानकंज, स्टॅडर्ड चार्टड बँकचे सहसंचालक संदिप खाडे, मेंटॉर्स फाऊंडेशनचे डॉ. संतोष भोसले, सीओओ कॅटरपिलर, सी.के. बिर्ला ग्रुपचे तन्मय मुजुमदार, विप्रो अँड जीई हेल्थ केअरचे राजीव कौशिक आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, सीटी स्कॅन यंत्राची गोर गरीब व गरजू लोकांना अल्प दरात सुविधा द्यावी. सीएसआरच्या माध्यमातून अनेक उद्योगसंस्था मदत करत आहेत. त्यांच्याद्वारे निर्माण करण्यात आलेल्या सुविधांचा योग्यरितिने वापर करण्यात यावा. बारामती जसे एज्युकेशन हब झाले आहे तसेच मेडीकल हब होऊ पाहत आहे. सर्व सोयीसुविधा येथे उपलब्ध होत आहेत. त्याचा लाभ सामान्य जनतेला होणे अपेक्षित आहे. रुग्णांना तत्परतेने सेवा देण्याचा प्रयत्न करावा. सर्व रुग्णांना चांगली सेवा उपलब्ध करावी. सिटी स्कॅन यंत्रासाठी तज्ञांची नियुक्ती करावी. वैद्यकीय महाविद्यालयात ओपीडी सुरु करण्यासाठी संबंधितांनी कार्यवाही करावी. प्रत्येक जिल्ह्यात एक तरी वैद्यकीय महाविद्यालय असणे आवश्यक असून त्यासाठी शासनाचे प्रयत्न चालू आहेत.

कोरोनासंबंधी बोलताना ते म्हणाले, डॉक्टरानी मानवसेवेचा वसा स्वीकारुन कोरोना काळात खूप चांगली कामे केली. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनीदेखील चांगली कामगिरी केली. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात यावा. सर्वांनीच कोरोनामुक्त राहण्यासाठी प्रयत्न करावा. सध्या कोरोना बाधितांची संख्या कमी होतांना दिसत असली तरी नागरिकांनी मास्कचा वापर करावा. कोरोना नियमांचे सर्वांनी पालन करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

उद्घाटनापूर्वी उपमुख्यमंत्री पवार यांनी आयसीयु युनिट, बालउपचार कक्षाची पाहणी केली. तसेच ‘डॉक्टरर्स फॉर यू’ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आलेले 20 ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर व 20 व्हेंटिलेटरचे लोकार्पण केले व शासकीय महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या नवीन अद्ययावत व्यायामशाळेचे उद्घाटनही पवार यांच्या हस्ते करण्यात आले.