अजय गोगावलेचा ‘सोयरीक’ चित्रपटातील गाण्याला स्वरसाज


सध्या देशभरात नवरात्रोत्सवाची लगबग सुरु असून या दिवसात प्रत्येकजण आदिमायेचा जागर करत तिच्या शक्तीची उपासना करीत असतो. यल्लमा देवीचा जागर करीत गायक संगीतकार अजय गोगावले यांनीसुद्धा तिचा गोंधळ घातला आहे. त्यांनी हा गोंधळ ‘सोयरीक’ या मराठी चित्रपटासाठी गायला आहे.

या गोंधळाचे बोल ‘डोई धरीला धरीला आईचा देव्हारा, भाळी लाविला लाविला देवीचा भंडारा… पाला लिंबाचा बांधिला, तुझा मळवट भरीला, तुझी भरून गं वटी, तुला निवद दाविला…आई गोंधळ मांडिला ये गं तू जागरा, येल्लू आईचा उधं उधं…’ असे असून हे बोल गोंधळ गीतकार वैभव देशमुख यांनी लिहिला असून संगीतकार विजय गावंडे यांनी संगीतबद्ध केला आहे.

अजय गोगावले गोंधळाबद्दल बोलताना सांगितले की, ‘जोगवा’ नंतर ‘सोयरीक’ चित्रपटामुळे मला परत गोंधळ गाण्याची संधी मिळाली आहे. याआधी विजयसोबत काम केल्यामुळे ‘मळवट’ या गोंधळासाठी छान ट्यूनिंग जमले व हा गोंधळ गातानासुद्धा खूप मजा आली. ‘अदिती म्युझिक’ कंपनीने घटस्थापनेच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला आलेल्या या गाण्याचे हक्क घेतले आहेत.

‘सोयरीक’ चित्रपटात आपल्यातील स्वार्थ अन निस्वार्थाची लढाई यात एक हलकी धूसर रेष असते त्यावर तुम्ही कसे उभे आहात? त्यावर तुमची ‘सोयरीक’ अवलंबून असते आणि तेच मांडायचा प्रयत्न करण्यात आला आहे. मकरंद माने लिखित-दिग्दर्शित आणि विजय शिंदे, शशांक शेंडे, मकरंद माने निर्मित ‘सोयरीक’ हा कौटुंबिक धाटणीचा मनोरंजक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.