रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी कवच-कुंडल मोहीम राबवावी : छगन भुजबळ


नाशिक : तालुक्यांतील वाढती रूग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी मोहीम स्तरावर जनजागृतीसह ‘कवच-कुंडल’ मोहिमेत लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. येवला व निफाड तालुका कोरोना सद्यस्थिती व उपायोजना आढावा बैठक प्रसंगी पालकमंत्री भुजबळ बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संजय बनकर, प्रांताधिकारी सोपान कासार, तहसीलदार प्रमोद हिले, शरद घोरपडे, येवला नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, येवला उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य अधिकारी डॉ. शैलजा कृपास्वामी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता अर्जुन गोसावी, शाखा अभियंता गणेश चौधरी, मुकेश पवार, हितेश मोरे, सहायक अभियंता सागर चौधरी, उमेश पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, येवला तालुक्यातील वाढती रूग्णसंख्या व संभाव्य धोका लक्षात घेवून प्रत्येक नागरिकाचा लसीकरणाचा पहिला डोस प्राधान्याने पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी आरोग्य यंत्रणांनी लसीकरण केंद्राची संख्या वाढवावी. तसेच या करीता आवश्यकतेनुसार मनुष्यबळासाठी मानधन तत्वावर परिचारीका व आरोग्यकर्मी यांच्या सेवा मानधन तत्वावर घेण्याच्या सूचनाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

ग्रामीण भागात लसीकरण वाढविण्याच्या दृष्टीने गावातील सरपंच, ग्रामसेवक, शिक्षक यांच्याशी समन्वय साधून लसीकरणाच्या डेटा एंट्रीसाठी निश्चितच मदत मिळू शकते. त्याचप्रमाणे दिवसाला 8 हजार पर्यंत लसीकरण होण्यासाठी लसीकरणाची वेळ सुध्दा वाढवावी, असेही निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी देताना पालकमंत्री भुजबळ म्हणाले, बाधित रूग्णांना गृहविलगीकरणात न ठेवता त्यांना त्वरीत रूग्णालयात दाखल करण्यात यावे. तसेच वाढत्य संक्रमाणाची साखळी तोडण्यासाठी कोविड रूग्णालयात रुग्णांना भेटीस येणाऱ्या नातेवाईकांची गर्दी होणार नाही, यासाठी कडक निर्बंध करावेत, अशा सुचनाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिल्या आहेत.

अतिवृष्टीतील नुकसानीचा घेतला आढावा
याबैठकी दरम्यान येवला व निफाड तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकासानीचा आढावा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतला. बाधित शेतकरी, मृत जनावरे, पडझड झालेली घरे यांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरीत करून त्याचा अहवाल जिल्हधिकारी कार्यालयास पाठविण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला पालकमंत्री भुजबळ यांनी दिल्या आहेत. तसेच पंचनामा करतांना ड्रोन पध्दतीचा वापर प्रामुख्याने करावा, असेही त्यांनी यावेळी सुचित केले.

कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत धनादेशाचे वाटप
यावेळी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या श्रीमती शोभा गणेश बडोदे, येवला, श्रीमती अफसाना इम्रान शेख, येवला, गंगाधर दगु पोळ, येवला, सुनिल रमेश गायकवाड, बाभुळगांव, अण्णसाहेब यादव झाल्टे, अंगुलगांव, देवराम शंकर माने, महालखेडा चां. यांना कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या अंतर्गत प्रत्येकी रुपये 20 हजार धनादेशाचे वाटप पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.