कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती


जालना : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यामुळे सर्व बाजारपेठा, शाळा आणि थिएटर सुरू करण्यात आले आहे. पण, अद्यापही कोरोनाची तिसरी लाट येण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. पण, ऑक्टोबरनंतर किंवा दिवाळीनंतर तिसरी लाट आली, तरी ती जास्त प्रभावी ठरणार नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राजेश टोपे यांनी जालन्यात पत्रकारांशी बोलत असताना राज्यातील कोरोनाची परिस्थिती, लसीकरण आणि राजकीय घडामोडींवर भाष्य केले. टास्क फोर्सने सांगितल्याप्रमाणे ऑक्टोबरनंतर किंवा दिवाळीनंतर तिसरी लाट आली, तरी ती जास्त प्रभावी ठरणार नाही, त्याचा मोठा परिणाम होणार नसल्याचे अधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेनंतर लक्षात आले आहे.

कोरोनाची तिसरी लाट अमेरिका, युरोपमध्ये आली, पण तिचा प्रभाव जास्त दिसून आला नाही. पण कोरोनाची दाहकता लसीकरणामुळे कमी करता येऊ शकते, असेही ते म्हणाले. परभणी जिल्ह्यात एका विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे शाळा 10 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात शालेय शिक्षण विभागाला आरोग्य विभागाने काही सूचना केल्या असून आणखी अशी घटना घडल्यास शालेय शिक्षण आणि विभाग त्या सूचनेनुसार निर्णय घेईल, असेही टोपे म्हणाले.

नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली, तरी तिथे काळजी करण्याची गरज नाही. तिथे लसीकरण वाढवण्यासोबतच कोरोना टेस्टिंग वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही टोपे यांनी सांगितले. कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने ‘मिशन कवचकुंडल’अभियान सुरू केले आहे. राज्यात या अभियानाअंतर्गत दररोज 15 लाख जणांना लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

पण राज्यात लसींचा साठा उपलब्ध असताना देखील काल राज्यात १५ लाख लशीचे लक्ष्य पूर्ण झाले नाही. याबद्दल टोपे यांनी स्पष्टीकरण दिले असून सुरू असलेला पाऊस, अतिवृष्टी आणि सध्या कामांचे दिवस असल्यामुळे ठरवलेला आकडा गाठता आला नाही, पण यासंदर्भात अधिकाऱ्यांची २ वेळा बैठक घेण्यात आली असून लसीकरण करणे हे आरोग्य विभागासमोर आव्हान आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले जातील, असे टोपे यांनी म्हटले आहे.