पुन्हा लॉकडाऊनपेक्षा नागरिकांनी सतर्क राहून संभाव्य लाट थोपवावी : छगन भुजबळ


नाशिक : जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्या वाढत नसली तरी एक हजारांच्या आसपास स्थिर आहे. लसीकरणाचा वेग विक्रमी वाढवण्यासह जिल्ह्यातील कोरोना संक्रमणात संवेदनशील असलेल्या ठिकाणांचा व परिसराचा अंदाज घेऊन त्या ठिकाणांवर तात्काळ कॉन्टॅक्ट ट्रसिंगची मोहिम गतीमान करण्यात येईल.

तसेच जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या तालुक्यांतील ग्रामीण भागात नागरिकांनी कठोर निर्बंधाची वेळ न येवू देता सतर्कता बाळगून संभाव्य लाट थोपवावी, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. ते जिल्हाधिकारी कार्यालयात मालेगाव येथून कोरोना विषयक लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते.

यावेळी बोलतांना मंत्री भुजबळ म्हणाले, नवरात्रोत्सव, दसरा दिवाळी यासारख्या सणांच्या निमित्ताने व बाजारांच्या निमित्ताने होणारी गर्दी पाहता नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना मास्क, सॅनिटाईजर, व सुरक्षित अंतराच्या नियमांचा अंगिकार केला नाही तर पुन्हा परिस्थिती गंभीर होवू शकते. त्यामुळे वेळ आल्यास निर्बंधही कठोर करावे लागतील. प्रवासावर बंधने शिथिल झाल्यानंतर नागरिकांचा मुक्तसंचार तालुक्यात व जिल्हास्तरावर होत आहे. सर्वांवर सरसकट बंधने आणने अव्यावहारिक असल्यामुळे त्यापैकी नेमके कोविड संसर्गाचा दृष्टीने संवेदनशील क्षेत्रात कोठून नागरिक जात आहेत अथवा कोणत्या कारणासाठी जात आहेत याची व्यवस्थित शहानिशा करून, योग्य प्रकारे हॉटस्पॉट ठरवून त्या हॉटस्पॉट कडे विशेष लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

हे तत्त्व लक्षात ठेवून कोविडचा अधिक प्रभाव असलेल्या जिल्ह्यांना लागून असलेल्या तालुक्यांमधील नागरिकांच्याआवागमनाची ठिकाणे प्रशासनाकडून निश्चित करण्यात येत आहेत. त्यांची पडताळणी करून संबंधित तालुका प्रशासनाशीसमन्वय साधून कोविड नियमांचे पालन करण्याबाबत त्या त्या आस्थापना चालकांना लेखी कळविण्यात येणार आहे. बाधित क्षेत्रातून आपल्याकडील तालुक्यांमध्ये येत असलेले नागरिक सुद्धा नेमके कोणत्या ठिकाणी अधिक प्रमाणात येत आहेत ते हॉटस्पॉट निश्चित करून त्या ठिकाणी देखील प्रतिबंधात्मक सर्व काळजी घेतली जात असल्याची खात्री करण्यात येणार आहे.

सर्व आस्थापनाकडून कोरोना प्रतिबंधासाठी सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करत असल्याबाबतचे प्रमाणपत्र घेण्यात येणार आहे. ग्राहकांची संख्या जास्त असलेल्या सर्व आस्थापनांमध्ये थर्मल गन व पल्स ऑक्सिमीटर द्वारेग्राहकांची तपासणी व त्याबाबतची नोंद ठेवण्यात येणार आहे. लक्षणे असलेले नागरिक अशा ठिकाणी आढळून आल्यास त्यांना टेस्ट साठी रॅट (RAT) केंद्राकडे पाठवण्याच्या सूचना संबंधित आस्थापना चालकांनाद्याव्यात, असे यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.

यावेळी ते म्हणाले, कॉन्टॅक्ट टेसिंगमध्ये एखादी अस्थापना वारंवार येत असल्याचे निदर्शनास आले तर संबंधित अस्थापना बंद करण्याची कार्यवाही करावी. गृह विलगीकरणात असलेल्या व्यक्तींची तपासणी करून त्या ठिकाणी गृह विलगीकरणाचे सर्व नियम पालन करण्यात येत असल्याची खात्री करावी अन्यथा सदर रुग्णास नजिकच्या सीसीसी (CCC) केंद्रात त्यांना दाखल करावे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मध्ये येणाऱ्या व्यक्तींची कोविड चाचणी करणे बंधनकारक करावी, परंतु त्या व्यतिरिक्त प्रत्येक तालुक्यांतील हॉटस्पॉट निश्चित करून तेथे फिरणाऱ्या व लक्षणे असणान्या सर्व व्यक्तींची कोविड टेस्ट करून घेण्याची व्यवस्था त्या हॉटस्पॉट च्या आस्थापना चालकांच्या मदतीने स्थापित करावी. त्यासाठी रॅट चाचणीची ठिकाणे निश्चित करून त्यास प्रसिद्धीही देण्यात यावी.

असे सांगून पालकमंत्री भुजबळ म्हणाले, तालुक्यामधील संसर्गाची ठिकाणे निश्चित करून सर्व विभागाच्या समन्वयाने नियमांचे पालन होत असल्याची खात्री करावी. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापना व व्यक्ती यांच्या विरुद्ध कारवाई करावी. कोविड चाचणी केल्यानंतर रिपोर्ट येईपर्यंत संबंधित व्यक्ती विलगीकरणात राहील याबाबत स्थानिक प्रशासन व आरोग्य विभाग यांनी दक्षता घ्यावी. कोरोना प्रादुर्भावासंबंधी कॉन्टॅक्ट टेसिंग, लक्षणे, विलगीकरण कार्यवाही याबाबत तालुका आरोग्य अधिकारी यांनी सर्व ग्रामस्तरीय आरोग्य कर्मचारी यांना सूचना देऊन काटेकोर अंमलबजावणीसाठी प्रवृत्त करावे.

कृषी उत्पन्न बाजार समित्या, कांदा टोमॅटो यांचे बाजार याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने तेथे गर्दी प्रतिबंधक उपाययोजना केल्या आहेत किंवा कसे तसेच मास्क चा वापर, शारीरिक अंतर याबाबत दक्षता घेतली जात आहे किंवा कसे याबाबत स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी बाजाराच्या दिवशी भेटी देऊन संबंधितांकडून योग्य कार्यवाही करून घ्यावी. संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी साप्ताहिक बैठक घेऊन रुग्ण कोठे वाढत आहेत व कोणत्याकारणाने वाढत आहेत याची कारणमीमांसा करावी व त्या दृष्टीने योग्य उपाययोजना तातडीने कराव्यात, असेही यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.

अमृतमहोत्सवाच्या औचित्याने सलग ७५ तास लसीकरणाची मोहिम घ्यावी : कृषिमंत्री दादाजी भुसे
जिल्ह्यात आजपासून कवच-कुंडल मोहिम सुरू झाली असून या मोहिमेत लोकसहभाग वाढविण्यासाठी काही नाविन्यपूर्ण मोहिमांची जाणीवपूर्वक आखणी करण्यात यावी. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहोत. त्याचे औचित्य साधून सलग ७५ तास लसीकरणाची मोहिम प्रायोगिक तत्वावर मालेगाव मध्ये राबविण्यात यावी. त्याचबरोबर मालेगाव येथे सामान्य रुग्णालयात मंजूर ऑक्सिजन प्लांट तात्काळ कार्यान्वित करण्यात यावा. मालेगाव सामान्य रूग्णालयात आसपासच्या तालुक्यांतील रूग्णही येत असतात. त्यामुळे सध्याच्या जागेचे विस्तारीकरण करण्यासाठी एक मजला वाढविण्याचा १५ कोटी रूपयांचा प्रस्ताव देण्यात आला असून त्यास मंजूरीसाठी आरोग्य प्रशासनाने कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केल्या आहेत.

गाव–पाड्यांवर रूग्णवाहिकांमधून लसीकरण करण्यात यावे : विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ
आदिवासी बहुल भागातील पेठ, सुरगाणा, कळवण इगतपुरी भागातील बहुतांश नागरिक हे वाड्या-पाड्यंसह शेतात राहतात. या भागात रूग्णवाहिकेच्या माध्यमातून लसीकरण केल्यास त्यास मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळेल, मंगळवारी नियोजन केल्यास त्यास विक्रमी प्रतिसादही मिळू शकतो. त्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन करून कवच-कुंडल मोहिमेत हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी यावेळी केले.

आठवडे बाजार सुरू करण्याचा प्रस्ताव राज्य प्राधिकरणाला पाठवणार : जिल्हाधिकारी सूरज मांढरे
जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी असलेले विविध निर्बंध हटविण्यात आले असून जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार सुरू करण्याचा प्रस्ताव राज्या आपत्ती नियंत्रण प्राधिकरणास लगेच आजच पाठवून त्यास मान्यता घेतली जाईल असे सांगून जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नवरात्रोतसवाच्या कालावधीत मंदिर परिसरात गर्दिच्या ठिकाणी लसीकरणाची मोहिम हाती घेण्यात येणार असून आठवडे बाजार सुरू झाल्यानंतर तेथेही अशा प्रकारची मोहिम सुरू करण्यात येणार असून लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी या मोहिमेत सहभाग नोंदविल्यास जिल्ह्यातील लसीकणची टक्केवारी वाढून तिसऱ्या लाटेपासून जिल्ह्याचा बचाव करण्यासाठी शासन-प्रशासनास मदत होईल.