‘इन टू द वाइल्ड विथ बेअर ग्रील्स’मध्ये झळकणार बॉलीवूडचा सिंघम; टीझर रिलीज


‘इंटू द वाइल्ड विथ बेअर ग्रील्स’ हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो असून प्रेक्षक या शोचा प्रत्येक एपिसोड पहाण्यासाठी खूप आतुर असतात. शोचा होस्ट बेअर हा खूप कठीण परिस्थितीत राहून मनुष्य कसा जगू शकतो, हे दाखवतो. खूप काळापासून सुरू असलेला हा शो असून बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता अक्षय कुमार , साऊथचे सुपरसटार रजनीकांथ यांनी यात हजेरी लावली आहे. आता या शोमध्ये बॉलिवूडचा सिंघम अर्थात अजय देवगण झळकणार आहे. यामुळे अजय देवगणच्या अनेक चाहत्यांना आनंद झाला आहे.

आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर या विशेष भागाचा टीझर डिस्कव्हरी प्लसने शेअर केला आहे. या टीझरमध्ये अजय देवगण या भागात कोणते स्टंटस् करताना दिसेल याची झलक पाहायला मिळत आहे. अजय देवगणचा आवाज व्हिडीओच्या सुरुवातीला ऐकायला येतो, ज्यात तो म्हणतो, हा मंच फक्त साहसी लोकांसाठी आहे.. हा काही गेम नाही. हा टीझर शेअर करत, जंगलात राहणं हे खूप कठीण असते. बॉलिवूडचा शेर अजय देवगणने अल्टीमेट सरवायवल चॅलेंज स्वीकारले आहे, बघूया की तो हे चॅलेंज पूर्ण करु शकेल का? असे चॅनलने म्हटले आहे.


डिस्कव्हरी प्लस अॅपवर २२ ऑक्टोबर रोजी अजय देवगणच्या या भागाचा प्रीमिअर होणार आहे. तसेच २५ ऑक्टोबर रोजी डिस्कव्हरीवर प्रसारित होईल. मालदीव येथे या भागाचे चित्रीकरण झाले आहे. ‘मॅन वर्सेस वाईल्ड’ या कार्यक्रमादरम्यान बेअर ग्रिल्सने आतापर्यंत अनेक जंगल आणि पर्वतांवर अॅडव्हेंचर ट्रीप केल्या आहेत. या सर्व ट्रीपमध्ये त्याने कुठल्या ना कुठल्या भयंकर परिस्थितीशी झुंज दिली आहे.

बर्फाच्छादित पर्वतांवर आपले प्राण वाचवण्यासाठी पळण्यापासून, पाण्यात पोहत दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत जाण्यापर्यंत, तर कुठल्या जंगली प्राण्याला मारुन आपली भूक भागवणे, यांसह अनेक गोष्टी बेअर ग्रिल्स अगदी सहजरित्या करतो. त्यामुळे या शोमध्ये अजय देवगणला कुठल्या भयंकर परिस्थितीचा सामना करवा लागणार आहे हे पाहण्यासाठी त्याचे चाहते या भागाची वाट बघत आहेत.