खो-खो खेळाला प्रतिष्ठा व लोकप्रियता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार – अजित पवार


पुणे : देशाच्या मातीतला खेळ असलेल्या खो-खो खेळाला प्रोत्साहन मिळावे यासाठी कबड्डीच्या धर्तीवर स्पर्धा भरवून खो-खो खेळाला प्रतिष्ठा व लोकप्रियता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनतर्फे पीवायसी जिमखाना येथे आयोजित पुरस्कारार्थी खेळाडूंच्या गौरव कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार अनिकेत तटकरे, अभिमन्यू पवार, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीव राजे निंबाळकर, सचिव गोविंद शर्मा, अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू श्रीरंग इनामदार, सारिका काळे, खो-खो खेळाचे मार्गदर्शक डॉ चंद्रजित जाधव, विश्वस्त अरूण देशमुख, वैशाली लोंढे आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, प्रत्येकाने एकतरी खेळ खेळलाच पाहिजे. खेळ तरुणांना जिंकण्यासाठी आवश्यक असलेला उत्साह आणि ऊर्जा देतो. शरिराची व मनाची जडण-घडण खेळांच्या माध्यमातून होत असते. आयुष्यात खेळांमुळे नेतृत्वंगुणांना वाव मिळतो. टीव्ही, लॅपटॉप आणि मोबाईल समोर बसणाऱ्या आजच्या युवा पिढीने मैदानी खेळाकडे वळण्याची आवश्यकता आहे.

गेल्या काही दिवसात ‍क्रिकेट सोबतच इतरही सांघिक आणि वैयक्तिक खेळात राज्यातल्या अनेक खेळाडूंनी आपली चमक दाखविली आहे. यामध्ये खो-खोच्या खेळाडूंचा मोठा वाटा आहे. भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत आपल्या मुलांच्या आणि मुलींच्या संघाने सातव्यांदा विजेतेपद पटकावले आहे. ही राज्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे शासनाचे प्रयत्न
राज्यातल्या खेळांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आघाडी सरकारने राज्याचे स्वतंत्र क्रीडा धोरण तयार केल्याचे सांगून पवार म्हणाले, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप उमटविणाऱ्या खेळाडूंना शासन सेवेत वर्ग एकच्या पदावर नोकरीच्या संधी दिल्या आहेत. राज्यातल्या खेळाडूंसाठी शासन सेवेत 5 टक्के कोटा राखीव ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय आघाडी सरकारने घेतला. कबड्डी, खो-खो, नेमबाजी, कुस्ती या खेळात देशाचे आणि महाराष्ट्राचे नाव उंचावणाऱ्या खेळाडुंना राज्य शासनाच्या सेवेत सामावून घेण्यात आले आहे. त्यामुळे खेळांना प्रोत्साहन मिळत आहे.

शहरी भागात खो-खो लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न करा
खो-खो च्या राज्य संघटनेने यापुढे शहरी भागात खो-खो खेळ पुन्हा लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण भागातील होतकरु, गुणी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नियमीतपणे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात यावे. शहरी भागातील क्रीडा मंडळे, क्लब कमी होत असताना त्यांना पुन्हा या प्रवाहात आणण्यासाठी राज्य संघटनेने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आशियाई पातळीवर खो-खो खेळाची प्रतिष्ठा वाढविण्याचे काम राज्य संघटनेवर आहे. त्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवावेत. खो-खोसह कबड्डी, कुस्ती सारख्या खेळांना प्रोत्साहन आणि सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे पवार त्यांनी सांगितले.

सारिका इतर खेळाडूंसाठी मार्गदर्शक, प्रेरणादायी
खो-खो खेळातल्या कामगिरीसाठी देशातील मानाचा अर्जून पुरस्कार मिळवणारी खेळाडू सारिका काळे आणि तिला प्रशिक्षण देणारे चंद्रजित जाधव यांचा राज्याला अभिमान आहे. सारिका काळे यांनी अत्यंत खडतर परिस्थितीत, अनेक संकटांवर, आव्हानांवर मात करुन इथपर्यंतची वाटचाल केली आणि मोठे यश मिळवले. त्यांची वाटचाल ही इतर खेळाडूंसाठी मार्गदर्शक तसेच प्रेरणादायी असल्याचे पवार यांनी सांगितले.

आमदार अभिमन्यू पवार यांनी खो-खो खेळाला दर्जा मिळवून देण्यासोबतच ‘शाळा तिथे खो-खो मैदान’ही संकल्पना राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. भारतीय खेळ वाढावा, खेळाला राष्ट्रीय पातळीवर लोकप्रियता मिळावी, यासाठी आपण संघटनेच्या माध्यमातून सातत्याने काम करणार असल्याचे निंबाळकर त्यांनी सांगितले.

भुवनेश्वर येथे गेल्या महिन्यात झालेल्या 40व्या कुमार-कुमारी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत सलग सातव्यांदा विजयी झालेल्या दोन्ही संघातल्या खेळाडूंचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे पदाधिकारी, खेळाडू, पालक उपस्थित होते.