भारताच्या दणक्यानंतर ब्रिटन सरकारने रद्द केली ‘ही’ अट


लंडन – भारताने जशास तसे उत्तर दिलल्यानंतर ब्रिटनने आता भारतीय प्रवाशांसाठी लस घेतल्यानंतर क्वारंटाईन करण्याची अट संपुष्टात आणण्याची घोषणा केली आहे. गुरुवारी ब्रिटन सरकारने सांगितले की ब्रिटनला येणाऱ्या भारतीय प्रवाशांना कोव्हिशिल्ड किंवा त्यांच्या सरकारने मंजूर केलेल्या इतर कोणत्याही लसीचे दोन्ही डोस घेऊन ११ ऑक्टोबरपासून क्वारंटाईन ठेवण्यात येणार नाही. भारताने याआधी आम्ही जशास तसे धोरण स्वीकारण्याचे ठरवले असल्याचे म्हटले होते. दरम्यान, ब्रिटनने आधी कोविन लसीकरण प्रमाणपत्रास मान्यता देण्यासही नकार दिला होता.

भारताने ब्रिटिनच्या निर्णयानंतर जशास तसे उत्तर दिले होते. भारतात येणाऱ्या सर्वच ब्रिटिश नागरिकांना आता दहा दिवसांच्या सक्तीच्या विलगीकरणात राहावे लागणार आहे. त्याशिवाय आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल सादर करावा लागेल. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी ४ ऑक्टोबरपासून करण्यात आली आहे.

त्यानंतर भारतातील ब्रिटीश उच्चायुक्त अॅलेक्स एलिस यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला. ब्रिटनला जाणाऱ्या भारतीय प्रवाशांना ११ ऑक्टोबरपासून कोव्हिशिल्ड किंवा इतर कोणतीही ब्रिटनने मंजूर केलेली लस घेणाऱ्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्याची गरज नाही. पण, त्यांनी भारताच्या स्वदेशी कोरोना लस प्रमाणपत्राबद्दल मौन पाळले आहे.