दिल्लीवरून महाविकासाघाडी सरकारला विविध गोष्टींवरून रोज त्रास दिला जात आहे – शरद पवार


सोलापूर – महाविकासाघाडी सरकारला विविध गोष्टींवरून दिल्लीवरून रोज त्रास दिला जात असल्याचे वक्तव्य आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. शरद पवार सोलापुरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलत होते. शरद पवार यांनी केंद्र सरकारवर यावेळी जोरदार निशाणा साधला. त्याचबरोबर, आयकर विभागाच्या छापेमारीवरून देखील शरद पवारांनी यावेळी टीका केली.

शरद पवार म्हणाले, दिल्लीमध्ये एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने मला सांगितले की, सगळ्यांशी तुमचे चांगले संबंध आहेत. पण त्या दिवशी तुम्ही जालियनवाला हत्याकांडाचा उल्लेख केला, ते काही त्यांच्या पचनी पडले नाही आणि म्हणून तुमच्याकडे पाहुणाचार झाला. लोकशाहीमध्ये एखाद्या प्रश्नावर मत मांडायचा अधिकार आहे की नाही? आणि लोकशाहीत मत माडले म्हणून तुम्ही घरांवर अशा पद्धतीने आणि ते देखील कुणाच्या बाया-बापड्याच्या, मुलींच्या ज्यांचा संबंध नाही. त्यांच्या घरावर तुम्ही छापे मारणार असाल, तर ठीक आहे तुम्ही मारा.. त्याची चिंता नाही. पण, हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा आहे, जिजामातेचा महाराष्ट्र आहे. सावित्राबाईंचा महाराष्ट्र आहे. आहिल्याबाईंचा महाराष्ट्र आहे. येथे आमची भगिनी कधीही लाचार होणार नाही. तुम्ही छापा मारा नाहीतर काही वाटेल ते करा, पण आपले मत कधी सोडणार नाही. सामान्य माणसांची बांधिलकी कदापी सोडणार नाही, या निष्कर्षाशी आपण सगळेजण आहोत.

तसेच, आज या ठिकाणी सरकार सुरू आहे, हे सरकार आघाडीचे आहे. सगळ्यांना घेऊन चालेले आहे. आघाडीचे सरकार असून देखील कुणी काहीही म्हटले तरी अत्यंत समंजसपणाने काम करत आहे. सरकारकडून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अतिवृष्टी झाली पहिला हप्ता देण्यासाठी ३६० कोटी रुपये काल दिले आहेत, आणखी दिले जाणार आहेत. शेतकऱ्याला संकटातून बाहेर काढायचे आहे. त्याच्या भल्यासाठी सरकार आहे, ही भूमिका असताना दिल्लीवरून या सरकारला अनेक गोष्टींवरून रोज त्रास दिला जात आहे.

त्याचबरोबर, मी आवाहन करतो की, महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी मिळून शेतकऱ्यांची हत्या करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध केला पाहिजे. ११ ऑक्टोबर रोजी या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद पुकारला आहे. आपण हा बंद यशस्वी केला पाहिजे, असे आवाहन देखील शरद पवारांनी यावेळी केले.

देशाची सत्ता ज्यांच्या हातात आहे, त्यांना शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही. लखीमपुर येथे आठ लोक मारले गेले. तुमच्या हातात सत्ता दिली, ती लोकांचे भले करण्यासाठी, पण भाजपला याचे विस्मरण पडले असल्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचे पाप केले. याबद्दल देशभरात संताप आहे. महागाईला निमंत्रण देणारी भाजपची आर्थिक नीती आहे. अशा राज्यकर्त्यांविरोधात जनमानस निर्माण करण्याचे काम विरोधी पक्षाला करावे लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता सामान्य लोकांच्या हितासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मला असल्याचेही यावेळी शरद पवार म्हणाले.