‘मिशन कवच कुंडल’ अंतर्गत राज्य सरकारचे दररोज 15 लाख लसीचे डोस देण्याचे लक्ष्य


मुंबई – कोरोनाच्या प्रादुर्भावात देशासह राज्यातही काही प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीतच देशात कोरोना लसीकरण मोहीमही वेगाने राबवली जात आहे. त्यातच राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी आज घटस्थापनेच्या दिवशी ‘मिशन कवच कुंडल’ची घोषणा केली आहे. केंद्र सरकारचे देशभरात दसऱ्यापर्यंत 100 कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. राज्यही त्या दृष्टीकोनातून प्रयत्नशील आहे. राज्य सरकारने दररोज 15 लाख लोकांना लस देण्याचे उद्दीष्ट आहे. महाराष्ट्र सरकारकडे सध्या 1 कोटी लशींचा साठा उपलब्ध असल्याची माहिती देखाली आरोग्यमंत्र्यांनी दिली.

देशात 15 ऑक्टोबर म्हणजेच दसऱ्याच्या दिवसापर्यंत 100 कोटी नागरिकांचे लसीकरण व्हावे, असे उदिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. त्यासाठी महाराष्ट्र देशातील इतर कोणत्याही राज्यापेक्षा कमी नाही. आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी देखील माझ्याशी फोनवर चर्चा करून राज्याचा या 100 कोटींच्या लसीकरणात मोठा सहभाग असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यासाठी आपण मिशन कवच कुंडल योजना 8 ते 14 ऑक्टोबरपर्यंत राबवणार आहोत. रोज किमान 15 लाख लसीकरण करण्याचे लक्ष्य राज्य सरकारने ठेवले आहे.

यापूर्वी लस उपलब्ध नसायची, तशी परिस्थिती आता नाही. या क्षणाला 75 लाख लसी आपल्याकडे उपलब्ध आहेत. 25 लाख लसी आज उपलब्ध होतील. त्यामुळे रोज 15 लाख लसीकरण केले, तर 6 दिवसांत हा स्टॉक पूर्णपणे संपवण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाला दिले असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. लसीकरणाची आजपर्यंतची एकूण टक्केवारी पाहाता राज्याला एकूण 9 कोटी 15 लाख एवढ्या नागरिकांचे दोन्ही डोस करायचे आहेत. यातील 6 कोटी नागरिकांना पहिला डोस पूर्ण झालेला आहे. उर्वरित 3 कोटी 20 लाख नागरिकांना पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट आहे. असे झाले तर राज्यातील 18 वर्षांवरील जवळपास सर्व नागरिकांना पहिला डोस पूर्ण होईल, अशी माहिती यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

ते पुढे बोलताना म्हणाले की, अडीच कोटी नागरिकांचा दुसरा डोस देऊन झाला आहे. टक्केवारीनुसार, पहिला डोस 65 टक्के नागरिकांना आणि दुसरा डोस 30 टक्के नागरिकांचा आपण पूर्ण केला आहे. आता पहिल्या डोसला प्राधान्य द्यायचे आहे. त्यानुसार, तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास देखील राजेश टोपे यांनी व्यक्त केला.