जगातील सर्वात मोठी रामलीला अयोध्येत सुरु

रामनगरी अयोध्येत फिल्मी कलाकारांच्या सहभागाने सादर होत असलेल्या १० दिवसांच्या रामलीलेची सुरवात ६ ऑक्टोबर पासून झाली असून १५ ऑक्टोबर पर्यंत रामलीला सादर केली जाणार आहे. याचे प्रक्षेपण दूरदर्शन सह अनेक सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरून, २६ भारतीय भाषांत सायंकाळी ७ ते १० या दरम्यान केले जाणार आहे. रामलीला आयोजन समिती कडून मिळालेल्या माहितीनुसार गतवर्षी या आयोजनाला जगातील सर्वात मोठी रामलीला असा खिताब मिळाला आहे.

या रामलीलेत सीतेची भूमिका भाग्यश्री करणार आहे तर विदु दारासिंग हनुमान साकारणार आहे. अभिनेता शाहबाज खान रावणाच्या भूमिकेत आहे तर रजा मुराद कुंभकर्ण साकारणार आहे. शक्तीकपूर अहिरावण साकारणार आहे. भोजपुरी कलाकार आणि राजकीय नेता रवी किशन परशुराम साकारणार आहे तर राजकीय नेते मनोज तिवारी अनेक भूमिका करणार आहेत. सुप्रसिद्ध गायिका मालिनी अवस्थी शबरी साकारणार आहेत.

शरयू काठी लक्ष्मण किला मैदानात हा कार्यक्रम होत आहे. अभिनेते रजा मुराद म्हणाले, गेल्या वेळी अहिरावण साकारला होता यंदा कुंभकर्ण साकारत आहे. गेल्या वेळी आलो तेव्हा राममंदिराचे भूमिपूजन झाले होते आज मंदिर प्रत्यक्षात तयार होताना दिसते आहे. अयोध्या हे पवित्र आणि पावन क्षेत्र आहे. आम्ही पैश्यासाठी येथे येत नाही तर श्रद्धेने येतो.

उत्तर प्रदेशचे सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री नीलकंठ तिवारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन केले गेले.