अंतराळ स्थानकावर सुरु होतेय पहिल्या चित्रपटाचे शुटींग

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जगात प्रथमच चित्रपट शुटींग सुरु होत असून रशियन अभिनेत्री युलिया परेसिल्ड व दिग्दर्शक क्लीस शिपेन्को रशियन सोयुज स्पेसक्राफ्ट मधून अंतराळ स्थानक प्रवासासाठी मंगळवारी रवाना झाले आहेत. कझाकीस्तानच्या बॅकोनूर रशियन स्पेसक्राफ्ट लाँच सेंटरवरून दुपारी १.५५ मिनिटांनी हे उड्डाण झाले. या दोघांबरोबर तीनवेळा अंतराळ प्रवास केलेले एंतनू शकाप्लेरोज हे अनुभवी प्रवासी आहेत.

युलिया आणि शिपेन्को नवा चित्रपट ‘ चॅलेंज’ मधील एक दृश्य स्पेस स्टेशनवर चित्रित करणार आहेत. हे चित्रण अंतराळस्थानकाच्या रशियाच्या हिश्श्यात होणार आहे असे समजते. युलिया या चित्रपटात डॉक्टरची भूमिका करत आहे. अंतराळ स्थानकातील हृदय विकाराशी झुंझत असलेल्या क्रू सदस्याचा जीव वाचविण्यासाठी ती येथे येते असा हा सीन आहे. युलिया आणि टीम १२ दिवस अंतराळात राहून पृथ्वीवर परतणार आहेत असे समजते.

युलिया सांगते, या साठी घ्यावे लागलेले प्रशिक्षण अतिशय खडतर होते. यात मानसिक आणि शारीरिक दोन्ही दृष्टीने कस लागला. दिग्दर्शक शिपेन्को यांची ओळख अनेक ब्लॉकब्लस्टर चित्रपट देणारे दिग्दर्शक अशी आहे. या चित्रपटात हृदय विकार असलेल्या रुग्णाची भूमिका रॉसकॉसमॉस चे अंतराळवीर ओलेग नोवित्सी करणार असून १७ ऑक्टोबरला पृथ्वीवर परतणाऱ्या सोयुझचे कॅप्टन तेच आहेत.