शाळांना भेट देऊन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी साधला विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद


मुंबई : शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी काही शाळांना भेटी देऊन विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनीही शिक्षणमंत्र्यांचे उत्साहात स्वागत केले. डी. एस हायस्कूल सायन, कुलाबा मनपा माध्यमिक शाळा (मराठी माध्यम), ब्लॉसम एस.टी. इंग्लिश स्कूल, मरिन लाईन्स, चर्चगेट, कुलाबा मनपा शाळा (इंग्रजी माध्यम) या शाळांमध्ये प्रा. गायकवाड यांनी भेट दिली. राज्यातील इतर शाळांमध्ये शालेय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पहिल्या दिवशी भेट दिली आहे. ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग कालपासून सुरु झाले आहेत.

मागील काही महिन्यांमध्ये आपण अनेकदा शाळा सुरु करण्याबाबतचे प्रयत्न केले पण कोविड -१९ ची तीव्रता लक्षात घेवून विद्यार्थी व शिक्षकांच्या आरोग्याचा विचार करून आपण प्रत्यक्षपणे शाळा सुरु करु शकलो नव्हते. आता सर्व काळजी घेऊन शाळा सुरु करण्यात आल्या आहेत.

प्रदीर्घ कालावधीसाठी शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याची शैक्षणिक गरज, त्याच्याजवळ शिक्षण घेण्यासाठी उपलब्ध असलेली शैक्षणिक साधने यानुसार त्याच्या गुणवत्ता वृद्धीसाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री प्रा. गायकवाड यांनी सांगितले.