मुंबई : पॅरामेडिकल अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी या अभ्यासक्रमाचा समावेश वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये करण्यात यावा असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले.
पॅरामेडिकल अभ्यासक्रमाचा समावेश वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये करण्यात यावा – अमित देशमुख यांचे निर्देश
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पॅरामेडिकल कोर्सबाबत बैठक मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.दिलीप म्हैसेकर, उपसचिव प्रकाश सुरवसे, उपसचिव सुरेद्र चानकर, वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे डॉ. सुशिल दुबे, डॉ. अरुणकुमार व्यास यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख म्हणाले की, सध्या राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 13 पॅरामेडिकल कोर्सेस (बॅचलर इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी) सुरु असून साधारणपणे यासाठी 2000 जागा उपलब्ध आहेत. या पदवीधारक विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्याबरोबरच अधिकाधिक मनुष्यबळ शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध होईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
पॅरामेडिकल अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील माहिती अधिक होण्याकरिता जिल्हास्तरावरील महाविद्यालयांमार्फत जास्तीत जास्त वृत्तपत्रात प्रसिध्दी देण्यात यावी. पॅरामेडिकल अभ्यासक्रम हे कौशल्यावर आधारित पदवी अभ्यासक्रम असून या अभ्यासक्रमांची आवश्यकता असल्याचे कोविड-19 काळात दिसून आले आहे.
येणाऱ्या काळात या 13 अभ्यासक्रमांमधील कोणत्या अभ्यासक्रमांची पुर्नरचना करणे आवश्यक आहे याबाबतचा अभ्यास करुन त्यांची पुर्नरचना वैद्यकीय शिक्षण संचालक यांनी करावी. तसेच अभ्यासक्रमाच्या पाठयक्रमामध्ये आवश्यक बदल व श्रेणीवर्धनाच्या दृष्टीने अभ्यासगट म्हणून उच्चस्तरीय समिती गठीत करुन त्याची पुर्नरचना करण्यात यावी, असे निर्देशही देशमुख यांनी दिले.