महावितरण कंपनीची विद्युत सहायक पदभरती प्रक्रिया पारदर्शक – प्राजक्त तनपुरे


मुंबई : महावितरण कंपनीची विद्युत सहायक पदभरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करण्यात आली असून कागदपत्रांची तपासणीही दक्ष राहून करण्यात येणार आहे. कोणत्याही उमेदवारावर अन्याय होणार नसल्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

एचएसबीसी, फोर्ट येथील महावितरण कंपनीच्या इमारतीत राज्यातील निवडक विद्युत सहायक उमेवारांच्या शंका निरसन करण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे म्हणाले, दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल पारदर्शकपणे जाहीर करण्यात आला आहे. या निकालाबाबत माध्यमांतून आणि समाजमाध्यमातून चुकीच्या पद्धतीने प्रसार करण्यात येत होते. याकरिता राज्यातील विविध भागातून विद्युत सहायक पदासाठी अर्ज केलेले आणि या निकालावर शंका असलेल्या उमेदवारांना बोलावून त्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले आहे. निकालात कसल्याही प्रकारची चूक झाले नसल्याचे तनपुरे यांनी स्पष्ट केले.

सर्व निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामध्ये कट ऑफ, राखीव जागा, आरक्षण, गुणांकन आदी बाबी स्पष्ट होतील. त्यानंतर कोणाचीही शंका राहणार नाही. भरती प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी कागदपत्रे तपासणी करून नियुक्ती पत्रेही देण्यात येणार आहेत. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक होत आहे. सर्व उमेदवारांना न्याय मिळणार आहे. कोणीही कसल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन तनपुरे यांनी यावेळी केले.