विद्यार्थी व शिक्षकांचा उत्साह पाहून वेगळाच आनंद झाला – धनंजय मुंडे


परळी -: कोविड कालावधीच्या मोठ्या ब्रेकनंतर प्रथमच परळी तालुक्यातील टोकवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत उपस्थित झालेल्या विद्यार्थ्यांना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गुलाब पुष्प देत त्यांचे शाळेत स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या वर्गात जाऊन त्यांच्याशी संवाद साधत पालकमंत्री मुंडे यांनी ‘वेलकम बॅक टू स्कूल…’ म्हणताच विद्यार्थ्यांनी एका सुरात ‘थँक यू सर…’ म्हणत दिलेल्या प्रतिसादाने शाळेत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.

कोविडच्या काळात जवळपास दीड वर्ष शाळा बंद राहिल्यानंतर, आता दुसरी लाट ओसरली आहे. राज्य सरकारने शाळांची घंटा वाजवण्याचा निर्णय घेतला असून राज्यात शाळा सुरू झाल्या असून राज्यभरात शिक्षणोत्सव साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा परिषद शाळा, टोकवाडी येथे जाऊन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व शिक्षणोत्सव पुढे अखंडित सुरू राहावा, अशा शुभेच्छा दिल्या.

पुन्हा नव्याने शाळा सुरू झाल्या आहेत, त्या आता कायम सुरू राहाव्यात यासाठी मास्क, सॅनिटायझर, अन्य स्वछता याबाबत दक्षता घेण्यात यावी. यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण केले जावे, शाळेचा परिसर स्वच्छ ठेवावा याबाबत संबंधितांना सक्त सूचना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या आहेत. यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेच्या आवारात वृक्षारोपण देखील करण्यात आले.

मधल्या काळात शाळा बंद राहिल्या पण शाळा पुन्हा सुरू होताना विद्यार्थी व शिक्षकांच्या मनातील उत्साह एक वेगळाच आनंद देतो आहे. तसेच मधल्या काळात झालेले शैक्षणिक नुकसानही भरून निघेल असा विश्वास वाटत असल्याची प्रतिक्रिया मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.