आर्यन खानला ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबीची कोठडी


मुंबई – अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आठ जणांना केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) प्रवासी जहाजावर अमली पदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी रविवारी अटक केली होती. यानंतर आर्यन खानला कालच एक दिवसाची एनसीबी कोठडी देखील सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज आर्यनसह इतर सात आरोपींना मुंबईतील किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यामुळे आर्यनला जेल होणार की बेल मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

अखेर न्यायालयाने याबाबत निर्णय दिला. त्यानुसार न्यायालयाने आर्यन खानबरोबरच मुनमुन धमेच्या व अरबाज सेठ मर्चंट या दोघांना देखील सात ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली गेली आहे. यानंतर त्यांना ७ ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. अन्य आरोपींबाबत देखील लवकरच निर्णय होणार आहे.

वकील सतीश मानशिंदे यांनी आर्यन खानकडून बाजू मांडली. तर दुसरीकडे, एनसीबीकडून अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी बाजू मांडली. तर, आर्यन खानच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह व धक्कादायक फोटो स्वरूपातील माहिती आढळल्याचे समोर आल्यामुळे, त्याच्या कोठडीत ११ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली जावी, अशी मागणी यावेळी एनसीबीकडून करण्यात आली होती.