पुणे – मंगळवारी म्हणजेच 5 ऑक्टोबर रोजी पुणे पोलीस आयुक्तालयातील रिक्त 214 शिपाई पदासाठीची लेखी परिक्षा होणार आहे. त्यासाठी 79 परीक्षा केंद्रावर तब्बल पावणेतीन हजार पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्याशिवाय परीक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व तयारी झाली असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.
214 पोलीस शिपाई पदासाठी पुण्यात उद्या परीक्षा
2019 मध्ये पुणे पोलीस आयुक्तालयातील रिक्त झालेल्या 214 पोलीस शिपाई पदासाठी जाहिरात देण्यात आली होती. पण, पोलीस भरती प्रक्रिया कोरोनामुळे लांबणीवर पडली होती. आता कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार 214 पदांसाठी तब्बल 39 हजार 323 उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
पोलीस भरतीमध्ये पहिल्यांदा लेखी परीक्षा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मंगळवारी होणाऱ्या परीक्षेच्या पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामध्ये अपर पोलीस आयुक्त-2, पोलीस उपायुक्त-8, सहायक पोलीस आयुक्त-13, पोलीस निरीक्षक- 76, एपीआय-87, पोलीस उपनिरीक्षक-80, कर्मचारी-2 हजार 478 नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलिसांकडून परिक्षार्थींसाठी सूचना
- परिक्षेच्या वेळेत मोबाईसह इतर इलेट्रॉनिक उपकरणे बाहेर ठेवावी लागणार
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी वेळेत उपस्थित राहणे बंधनकारक
- परीक्षेची वेळ संपल्यानंतर पर्यवेक्षकाच्या सूचनेनंतर जागा सोडावी.
- हॉल तिकीटसह आधार, पॅन, लायसन्स, पासपोर्ट जवळ बाळगा
- उमेदवारांनी निळे, काळे बॉलपेन वापरावे
- परीक्षा संपल्यानंतर प्रवेशपत्र पर्यवेक्षकाकडे जमा करावे लागणार
दरम्यान परीक्षार्थी उमेदवारांना इमेलवर हॉल तिकीटची लिंक पाठवली जाणार आहे. काही अडचण आल्यास 9699792230, 8999783728, 020-26122880 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने कले आहे.