तब्बल दीड वर्षानंतर शहरी, ग्रामीण भागांमधील शाळा सुरु


मुंबई – जवळपास दीड वर्षांहून अधिक काळ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि अन्य निर्बंधांमुळे बंद असलेल्या राज्यभरातील सर्व शाळा आजपासून पुन्हा सुरु झाल्या आहेत. आज (४ ऑक्टोबर) विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये गजबजून गेली आहेत. खरंतर, यापूर्वी राज्य सरकारने ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेतला होता. त्यानंतर, आता मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी मुंबईतील शाळा सुरु करण्यासही परवानगी दिली आहे. तसेच, पहिल्या दिवशी मुलांच्या स्वागतासाठी शिक्षणोत्सव साजरा करण्याची सूचना शालेय शिक्षण विभागाने केली आहे.

शाळा सुरु होत असल्या तरीही कोरोनाचा धोका अद्यापही पूर्णपणे टळलेला नसल्यामुळे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे स्पष्ट आदेश शासन-प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे, एका बाकावर एक विद्यार्थी, एक दिवसाआड उपस्थिती, मास्क-सॅनिटायझर या सर्व नियमांचे पालन करुनच शाळा सुरु होणार आहेत. अद्यापही कोरोना संपला नाही. सगळ्यांनीच काळजी घ्यायला हवी. आता आपणही काळजी घेऊन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी करोना नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

शाळेत १०० टक्के शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपस्थिती अनिवार्य आहे. कोरोनाची लस घेतली नाही, म्हणून अनुपस्थित राहण्याची मुभा शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नाही. तर महापौर पेडणेकर यांनी सांगितले की, मुंबईतील शिक्षकांसाठी विशेष लसीकरण मोहीम सुरू आहे. ७० टक्के शिक्षकांचे लसीकरणही झाले आहे. पालिकेच्या १० हजार शिक्षकांपैकी ७ हजार शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. या सर्वांचा आढावा घेण्यात येणार आहे.

कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून शाळा पुन्हा कशा सुरु करायच्या याबाबतच्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. स्वतः शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी तज्ज्ञांच्या मदतीने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे याबाबतचे मार्गदर्शन केले आहे. त्यानुसार त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त यांच्या मान्यतेने राज्यातील जवळपास बहुतांश भागांतील शाळा सुरू होत आहेत. त्याप्रमाणे, आता ग्रामीण भागांत पाचवी ते बारावीचे तर मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या शहरी भागांतील आठवी ते बारावीचे वर्ग भरणार आहेत.

दरम्यान, विद्यार्थी, शिक्षण आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळा पुन्हा सुरु करताना या नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे.

  • विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पालकांची मंजुरी असणे आवश्यक
  • विद्यार्थ्यांनी उपस्थिती मोठी असल्यास एक दिवस आड सुरु राहतील
  • १५ ते २० विद्यार्थ्यांनाच एका दिवशी प्रवेश
  • एका बाकावर एकच विद्यार्थी
  • सोशल डिस्टन्सिंग राखणे
  • मास्क घालणे, तसेच सॅनिटायझरचा वापर अनिवार्य असेल