दातांचे उत्तम आरोग्य जपण्यासाठी घरच्याघरी तयार करा टूथपेस्ट


आजकाल बाजारामध्ये निरनिराळ्या पद्धतींच्या आणि ब्रँड्सच्या टूथपेस्ट्स उपलब्ध आहेत. खास संवेदनशील दातांसाठी असलेल्या पेस्ट पासून, खास लहान मुलांच्या दातांसाठी योग्य, श्वासाची दुर्गंधी दूर करणाऱ्या, हिरड्या आणि दात मजबूत ठेवणाऱ्या अशा अनेक टूथपेस्ट्च्या जाहिराती नेहमीच आपल्या पाहण्यात येत असतात. या सर्वच टूथपेस्ट आपल्या दातांना अगदी पांढरे शुभ्र आणि निरोगी बनविण्याचे आश्वासनही आपल्याला देत असतात. पण बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या या टूथपेस्ट्स पैकी अनेकांमध्ये अनेक तऱ्हेची रसायने, किंवा कृत्रिम पदार्थ वापरले जात असतात.

रसायनमिश्रित टूथपेस्टचा वापर टाळण्यासाठी आणि दातांचे व हिरड्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आता महागड्या टूथपेस्टची खरेदी करण्याच्या ऐवजी अशी टूथपेस्ट घरच्याघरी देखील तयार करता येऊ शकते. या टूथपेस्ट मध्ये असणारे सर्व साहित्य सहज उपलब्ध होणारे असून, आयुर्वेदामध्ये औषधी म्हणून या साहित्याचा वापर सामान्यपणे केला जात असतो. या टूथपेस्टमध्ये सर्वात महत्वाचा पदार्थ कडूलिंब असून, हा पदार्थ दातांच्या आणि हिरड्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम मानला गेला आहे. या टूथपेस्टच्या वापराने हिरड्या बळकट होतात, दातांमध्ये कीड उत्पन्न होण्याचा धोका नाहीसा होतो, आणि दातांवर आलेला पिवळेपणाही दूर होतो.

बाजारामध्ये मिळणाऱ्या टूथपेस्ट्स मध्ये फ़्ल्युओराईड हे तत्व सर्रास आढळते, हे तत्व या घरगुती टूथपेस्ट मध्ये नाही. या टूथपेस्टमध्ये झायलिटोल, नारळाचे तेल, आणि बेकिंग सोडा यांचा वापर केला गेला आहे. ही टूथपेस्ट बनविण्यासाठी लागणारे साहित्य सहज आणि रास्त किंमतीमध्ये उपलब्ध होणारे असून, ही टूथ पेस्ट बनविण्याची कृतीही अतिशय सोपी आहे. ही टूथपेस्ट बनविण्यासाठी एक टेबलस्पून झायलिटोल, तीन टेबलस्पून बेकिंग सोडा, पंधरा थेंब पुदिन्याचे तेल, एक टेबलस्पून कडूलिंबाची पाने वाळवून त्यापासून तयार केलेली पूड, आणि तीन टेबलस्पून नारळाचे तेल, इतक्या साहित्याची आवश्यकता आहे. हे सर्व साहित्य एका बाऊलमध्ये मिसळून चांगले एकजीव करून ही पेस्ट तयार करायची आहे. तयार पेस्ट एका काचेच्या घट्ट झाकणाच्या बरणीमध्ये भरून ठेवावी, आणि दररोज दिवसातून दोन वेळा ब्रश करण्यासाठी वापरावी.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment