वैज्ञानिक बनविणार अठराव्या शतकातील ‘चेटकिणी’चे थ्री डी मॉडेल


२०१४ साली केल्या गेलेल्या उत्खननामध्ये पुरातत्ववेत्त्यांना पोलंड देशातील कामिएन पोमोर्स्की मध्ये एक हाडांचा सांगाडा सापडला. या सांगाड्याच्या तोंडामध्ये मोठा विटेचा तुकडा खुपसलेला असून, पायामध्ये मोठाले खिळे ठोकलेले आढळले, त्यावरून हा सांगाडा ज्या व्यक्तीचा होता, त्या व्यक्तीला मृत्यूपूर्वी भयंकर यातना दिल्या गेल्याचे स्पष्ट होत होते. हा सांगाडा अठराव्या शतकातील असून, त्याचे अधिक अध्ययन केल्यानंतर या व्यक्तीला ती ‘चेटकीण’ असल्याचे समजून यातना देऊन लोकांनी ठार केले असल्याचे निदान पुरातत्ववेत्त्यांनी केले. या सांगाड्याचे जेनेटिक आणि फोरेन्सिक विश्लेषण केले गेल्यानंतर हा सांगाडा एका स्त्रीचा असल्याचे निष्पन्न झाले.

या विश्लेषणाद्वारे या महिलेबाबत अनेक रोचक तथ्ये ही प्रकाशात आली. जिचा हा सांगाडा होता, ती महिला पाच फुट सहा इंच उंचीची असून, हिचे डोळे निळे असल्याचे निदान वैज्ञानिकांनी केले आहे. त्याचबरोबर हिचे केस ‘ब्लॉन्ड’ असून, ही मृत्यूसमयी सुमारे पासष्ट वर्षांची असल्याचा अंदाजही वैज्ञानिकांनी वर्तविला आहे. आता पोमेरेनियन वैद्यकीय विद्यापीठामध्ये या महिलेच्या सांगाड्याच्या कवटीचे थ्री डी मॉडेल तयार करण्यात येत आहे. हे मॉडेल तयार झाल्यांनतर या महिलेच्या चेहऱ्यावर काम करून ही महिला नक्की कशी दिसत होती हे समजणे शक्य होणार आहे.

विद्यापीठातील फोरेन्सिक्स अँड जेनेटिक्स युनिटमध्ये हा चेहरा तयार करण्याचे काम सुरु असून या कामी प्लास्टिक मटेरियलचा वापर करण्यात येणार आहे. या कामासाठी काही महिन्यांचा अवधी लागणार असून त्यानंतर पूर्ण झालेला या चेहरा पाहण्याची संधी इतरांना मिळणार आहे, तसेच या चेहऱ्याला एखाद्या प्रतिष्ठित वस्तूसंग्रहालयात नक्कीच स्थान मिळेल अशी आशाही वैज्ञानिकांना आहे. या कामी आधुनिक वैज्ञानिकाचा उपयोग करून केवळ कवटीच्या सहाय्याने चेहऱ्याचे पुनर्निर्माण करणे सहज शक्य झाले असल्याचे वैज्ञानिक म्हणतात. या महिलेला ती ‘चेटकीण’ असल्याच्या संशयावरून ग्रामस्थांनी अतिशय यातना देऊन मारले असावे असे निदान वैज्ञानिकांनी केले आहे.

Leave a Comment