झोपेत सुंदर कलाकृती रेखाटणाऱ्या कलाकाराला जागे झाल्यानंतर मात्र कलाकृतीचा पडतो विसर


अनेक लोकांना झोपेमध्ये बडबडण्याची किंवा झोपेत चालण्याची सवय असते. मात्र जागे झाल्यानंतर आपण काय बोललो, किंवा चालत चालत कुठवर गेलो, याची त्यांना अजिबात आठवण रहात नाही. ग्रेट ब्रिटनच्या वेल्स परगण्यामधील कार्डिफ शहरात राहणारा ली हेडविन हा तरुण मात्र निराळ्याच अवस्थेने ग्रस्त आहे. ली उत्तम चित्रकार असून, त्याने वयाच्या चौथ्या वर्षीपासूनच चित्र रेखाटण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी ली घरातील भिंतीवर आपली चित्रे चितारत असे. त्या वयातील बहुतेक सर्वच मुलांना भिंतींवर चित्रे काढण्याची हौस असते हे खरे असले, तरी सामान्य मुलांमध्ये आणि ली मध्ये मोठा फरक असा, की ली भिंतींवरील चित्रे निद्रावस्थेत काढत असे आणि जागे झाल्यानंतर मात्र त्याला आपल्या कलाकृतींचा साफ विसर पडत असे.

जसजसे ली चे वय वाढत गेले, तसतसा तो चित्रकलेत आणखीनच तरबेज होत गेला, मात्र आजतागायत लीने काढलेली सर्वच अप्रतिम चित्रे निद्रावस्थेत काढली आहेत, आणि जागे झाल्यानंतर आपण ही चित्रे कधी काढली याचा त्याला साफ विसर पडत असे, हे अविश्वसनीय वाटत असले, तरी सत्य आहे.

लीने वयाच्या पंधराव्या वर्षी सुप्रसिद्ध हॉलीवूड अभिनेत्री मर्लिन मन्रोची तीन पोट्रेट बनविली होती. पण ही तीनही अप्रतिम पोट्रेट लीने निद्रावस्थेत असताना बनविली असून, ही पोट्रेट आपण कधी बनविली याचा ली ला साफ विसर पडला आहे. यामध्ये विशेष गोष्ट अशी, की निद्रावस्थेत उत्तम चित्रे रेखाटणारा ली, जागेपणी साधेसे चित्रही व्यवस्थित काढू शकत नाही ! ली च्या या विचित्र अवस्थेचे कार्डिफ विद्यापीठातील पेनी लुईस नामक शास्त्रज्ञ महिलेने अध्ययन केले असता, निद्रावस्थेत चित्रकारी करताना लीचा अर्धा मेंदू सक्रीय असून, अर्धा मेंदू निद्रिस्त असल्याने, लीने झोपेमध्ये काढलेल्या चित्रांचा जागेपणी त्याला साफ विसर पडत असल्याचे निदान पेनी लुईस यांनी केले आहे.

ज्याप्रमाणे निद्रावस्थेत असल्याने मेंदूचा काही भाग सक्रीय असल्याने एखादी व्यक्ती झोपेत बडबडते किंवा अचानक उठून चालू लागते, तशीच अवस्था लीची देखील असल्याचे लुईस म्हणतात. लीच्या बाबतीत बोलायचे झाले, तर लीने जागेपणी पाहिलेली एखादी वस्तू, किंवा एखाद्या व्यक्तीची त्याच्या मनामध्ये घर करून राहिलेली प्रतिमा लीच्या चित्रांच्या माध्यमातून, तो निद्रिस्त असताना प्रकट होत असल्याचेही लुईस म्हणतात. मात्र मेंदूचा दुसरा भाग निद्रिस्त असल्याने आपण काढलेल्या चित्रांचा ली ला साफ विसर पडत असल्याचे निदान लुईस यांनी केले आहे.

Leave a Comment