केसांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवण्यासाठी आजमावा हे उपाय


अकाली पांढरे झालेले केस कोणालाही नकोसेच असतात. आजकालच्या काळामध्ये झपाट्याने बदलत चाललेल्या खानपानाच्या सवयी, जीवनशैली आणि त्यायोगे सतत जाणविणारा शारीरिक आणि मानसिक ताण, प्रसाधनांचा अतिवापर आणि त्यामुळे उद्भवणारे दुष्परिणाम यांमुळे अगदी तरुण वयातही अनेकांचे केस पांढरे होत असलेले पहायला मिळतात. अकाली पांढरे झालेले केस लपविण्यासाठी मग निरनिराळे हेअर डाय, आणि इतर हेअर प्रोडक्ट्सचा वापर सुरु होतो. पण यांपैकी बहुतेक सर्वच प्रोडक्ट्समध्ये अनेक रसायने समाविष्ट असल्याने याचे दुष्परिणामही केसांवर होऊ शकतात. केसांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवण्यासाठी काही घरगुती उपायांचा अवलंब नक्कीच केला जाऊ शकतो.

केसांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवण्यासाठी आवळा सहायक आहे. केसांच्या आरोग्यासाठी आवळ्याचा वापर करण्याचा सल्ला आयुर्वेदानेही दिला आहे. आवळ्याचा वापर करण्यासाठी आवळे चिरून त्याचे बारीक तुकडे करावेत आणि हे तुकडे कडक उन्हामध्ये चांगले वाळवून घ्यावेत. वाळलेल्या आवळ्याचे तुकडे खोबरेल तेलामध्ये घालून त्याचा चांगला कढ काढून घ्यावा. तेल चांगले उकळले की ते थंड होऊ द्यावे. थंड झालेले तेल बाटलीमध्ये भरून ठेवावे. या तेलाने केसांना आठवड्यातून किमान तीन वेळा मालिश करावी. जर हे तेल रात्रभर केसांना लावून ठेवणे शक्य नसेल, तर केस शँपू करण्याच्या तासभर आधी या तेलाने केसांना मालिश करावी आणि त्यानंतर तासाभराने केस नेहमीप्रमाणे सौम्य शँपूने धुवून टाकावेत. केस अकाली पांढरे होऊ लागल्यास ते पुन्हा नैसर्गिक रित्या काळे करण्यासाठी काळ्या मिऱ्यांचा वापर करता येऊ शकेल. केसांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवण्यासाठी हा उपाय कायम करावा. यासाठी काळे मिरे पाण्यामध्ये काही वेळ उकळून घेऊन हे पाणी गाळून घ्यावे. केस शँपूने धुवून झाल्यानंतर सर्वात शेवटी या पाण्याने केस धुवावेत. या पाण्याचा वापर नियमित केल्याने केसांचा नैसर्गिक रंग टिकून राहण्यास मदत होते.

खोबरेल तेलामध्ये लिंबाचा रस मिसळून या तेलाने केसांना नियमित मालिश केल्यासही केसांचा नैसर्गिक रंग टिकून राहण्यास मदत होते. लिंबाच्या रसाप्रमाणे कांद्याचा रसही केसांचा काळेपणा टिकवून ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर कांद्याच्या रसाच्या वापराने केस गळती थांबून केस दाट होण्यास मदत होते. एका वाटीमध्ये कांद्याचा रस काढून घेऊन त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस मिसळावा. या मिश्रणाने केसांना हळुवार मालिश करून हा रस केसांमध्ये अर्धा ते एक तास राहू द्यावा. त्यानंतर सौम्य शँपूने केस धुवावेत. या व्यतिरिक्त बदामाचे तेल, लिंबाचा रस, आवळ्याचा रस समप्रमाणात एकत्र करावा. या मिश्रणाने केसांना नियमित मालिश केल्यानेही अकाली पांढरे झालेले केस पुन्हा काळे होण्यास मदत होते. केसांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवण्यासाठी मेहंदी आणि कोरफडीचा गरही अतिशय उपयुक्त आहे. मात्र मेहंदीचा वापर करायचा असल्यास बाजारामध्ये तयार मिळणारी मेहंदी पावडर न वापरता, मेहंदीची ताजी पाने वाटावीत, त्यामध्ये थोडी कॉफी पावडर आणि दही घालून एकत्र मिसळावे आणि केसांवर लावावे. मेहंदी सुकल्यावर साध्या पाण्याने धुवावेत. यावेळी शँपूचा वापर करू नये.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment