श्रावण महिन्याला नुकतीच सुरुवात झाली असून, या महिन्यामध्ये येणाऱ्या पंचमीच्या दिवशी नागपंचमीचा उत्सव साजरा केला जात असतो. श्रावण शुक्ल पंचमीच्या दिवशी साजरा केला जाणारा हा सण यंदाच्या वर्षी पाच ऑगस्ट रोजी साजरा होत आहे. या दिवशी केल्या जाणाऱ्या नागपूजनाचे विशेष महत्व आहे. नागाला ब्राह्मण मानून त्याची पूजा केल्याने सर्पाचे भय दूर होत असल्याची मान्यता फार प्राचीन काळापासून रूढ आहे. याच कारणास्तव नागदेवतेला समर्पित अनेक प्राचीन मंदिरेही भारतामध्ये अस्तित्वात आहेत. ज्या व्यक्तींच्या पत्रिकेमध्ये कालसर्पदोष आहे, त्यांना या दोषापासून मुक्ती मिळण्यासाठी या मंदिरांमध्ये खास पूजा-अर्चा केली जात असते.
नागदेवतेला समर्पित प्राचीन मंदिरांमध्ये नागचंद्रेश्वर मंदिराचा समावेश आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असेलेल्या उज्जैनच्या महाकाळ मंदिराच्या परिसरामध्ये नागचंद्रेश्वराचे मंदिर आहे. या मंदिराची खासियत अशी, की हे मंदिर वर्षातून केवळ एकच दिवस भाविकांसाठी खुले केले जाते. महाकाळ मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावर शंकर-पार्वतींची तक्षक नागरूपी सिंहासनावर विराजमान मूर्ती आहे. नागपंचमीच्या दिवशी या मूर्तीचे दर्शन घेतल्याने कालसर्पदोष नाहीसा होत असल्याची मान्यता रूढ आहे.
प्रयागराज येथे असलेले तक्षकेश्वर नाथाचे मंदिर यमुना नदीच्या किनारी आहे. या अतिप्राचीन मंदिराचे वर्णन पद्म पुरणाच्या पाताळखंडातील प्रयाग महात्म्याच्या ८२व्या अध्यायात सापडते. या मंदिरामध्ये दर्शनास आल्याने केवळ भाविकासाठीच नाही, तर त्याच्या येणाऱ्या पिढ्यांनाही सर्पापासून कोणतेही भय राहत नसल्याची मान्यता आहे. केरळ राज्यातील अलेप्पी पासून सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या मन्नारशाला येथील मंदिरामध्ये तीस हजार नागप्रतिमा आहेत. सुमारे सोळा एकरांच्या परिसरामध्ये विस्तारलेल्या अरण्यामध्ये हे मंदिर उभे आहे. नागराजाला समर्पित या मंदिरामध्ये नागराजासमवेत त्याची अर्धांगिनी नागयक्षीची प्रतिमा आहे.
प्रयाराज येथे संगमाच्या जवळ असलेल्या दारागंज भागामध्ये नागवासुकी मंदिर आहे. या मंदिरामध्ये विराजमान असलेल्या वासुकी नागाला शेषराज, सर्पनाथ, अनंत आणि सर्वाध्यक्ष या नावांनीही ओळखले जाते. या मंदिरामध्ये नागपंचमीच्या दिवशी भाविक मोठ्या संख्येने दर्शनास येतात. या दिवशी मंदिरामध्ये दर्शन घेतल्याने कालसर्पदोष नाहीसा होत असल्याची मान्यत असून या दिवशी या मंदिराच्या परिसरामध्ये मोठय जत्रेचे आयोजन केले जात असते.