थायलंडमधील दुष्काळाने शुष्क झालेल्या धरणामध्ये अवतरले प्राचीन बुद्ध मंदिर


थायलंड येथील लोपबुरी प्रांतामध्ये असलेले धरणक्षेत्र सध्या दुष्काळामुळे संपूर्णपणे शुष्क झाले आहे. एरव्ही धरणामध्ये थोडाफार पाणीसाठा नेहमीच असल्याने धरणक्षेत्राच्या तळाशी नेमके काय काय दडले आहे हे पाहण्याची संधी नागरिकांना कधीच मिळाली नव्हती.

आता मात्र धरणक्षेत्र संपूर्ण शुष्क झाल्याने धरणाच्या पाणीसाठ्याच्या तळाशी असलेले प्राचीन बुद्धमंदिर प्रकट झाले असून, येथील बुद्धमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करीत आहेत.

थायलंड येथील हवामानखात्याने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार गेल्या दशकातील सर्वात भीषण दुष्काळस्थिती सध्या थायलंडमध्ये असल्याचे म्हटले आहे. या दुष्काळामुळे देशभरातील सर्वच धरणांतील पाणीसाठे कमी होत असल्याचे ही म्हटले आहे.

लोपबुरी क्षेत्रातील ‘वॉत नोंग बुआ याई’ या धरणामध्ये आता केवळ तीन टक्के पाणीसाठा राहिला असल्याने या धरणाच्या तळाशी असलेले प्राचीन बुद्धमंदिर आता दृष्टीस पडू लागले आहे. वीस वर्षांपूर्वी जेव्हा हे धरण बांधले गेले, तेव्हा हे मंदिर पाण्याखाली गेले असल्याचे समजते. या मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये हजारो बौद्ध भिख्खूंचाही समवेश आहे.

या मंदिराचे आता भग्न अवशेषच केवळ शिल्लक असून, यामध्ये एके काळी तेरा फुट उंचीची बुद्धमूर्ती एके काळी विराजमान असे. आता या बुद्धमूर्तीचे शीर नसले, तरी बाकीची मूर्ती चांगल्या स्थितीमध्ये आहे. अनेक भाविक येथे दर्शनासाठी येत असून, भक्तिभावाने फुले आणि इतर वस्तू बुद्धमूर्तीच्या चरणाशी अर्पण करीत आहेत.

Leave a Comment