जगातील सर्वात मोठ्या खादी तिरंग्याचे लेहमध्ये २००० फूट उंचीवर अनावरण


लेहमध्ये जगातील सर्वात मोठ्या खादीच्या राष्ट्रीय ध्वजाचे २ ऑक्टोबर हा गांधी जयंतीचा मुहूर्त साधून अनावरण करण्यात आले आहे. हा तिरंगा तिथे महात्मा गांधीजींच्या १५२व्या जयंतीनिमित्ताने लावण्यात आला असून लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर आर. के. माथूर यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. भारताचे लष्करप्रमुख मनोज नरवणे देखील यावेळी उपस्थित होते. हा सर्वात मोठा खादीचा ध्वज भारतीय लष्कराच्या ५७ इंजिनिअर रेजिमेंटने तयार केला असून तो लेहमध्ये समुद्रसपाटीपासून २००० फूट उंचीवर ठेवण्यात आला आहे.


लेहमध्ये २००० फूट उंचावर ठेवण्यात आलेल्या या ध्वजाची लांबी तब्बल २२५ फूट आहे. तर ध्वजाची रुंदी १५० फूट एवढी आहे. हा ध्वज पूर्णपणे खादीचा असून त्याचे वजन तब्बल १ हजार किलो एवढे आहे. हा ध्वज ५७ इंजिनिअर रेजिमेंटच्या १५० जवानांनी मिळून २००० फूट उंचीच्या टेकडीवर नेला.

दरम्यान, लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर आर. के. माथूर यावेळी प्रतिक्रिया देताना म्हणाले, गांधीजी म्हणाले होते, की आपला राष्ट्रध्वज म्हणजे एकता आणि मानवतेचे प्रतीक आहे. या देशातील प्रत्येकाने या प्रतीकाचा स्वीकार केला आहे. आपल्या देशाच्या महानतेचे हे प्रतीक आहे. यापुढील वर्षांमध्ये लेहमधील हा ध्वज आपल्या जवानांसाठी उत्साहाचे देखील एक प्रतीक असेल.


या ध्वजाचा व्हिडीओ देशाचे आरोग्यमंत्री मनसूख मांडविया यांनी ट्वीट करून त्यावर आपला संदेश लिहिला आहे. भारतासाठी हा प्रचंड अभिमानाचा क्षण आहे, कारण गांधीजींच्या जयंतीच्या दिवशीच जगातील सर्वात मोठ्या खादीच्या तिरंग्याचे अनावरण लेह-लडाखमध्ये झाले आहे. देशाचा सन्मान करणाऱ्या या कृतीला मी सलाम करतो, असे मनसुख मांडविया यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.