मुंबई महापालिका क्षेत्रातील धार्मिक स्थळे एकूण मर्यादेच्या 50 टक्के क्षमतेने उघडण्याची परवानगी


मुंबई – राज्यासह आर्थिक राजधानी मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असल्यामुळे आता हळूहळू कोरोना निर्बंध शिथिल केले जात आहेत. दरम्यान मुंबई महापालिका क्षेत्रातील धार्मिक स्थळे एकूण मर्यादेच्या 50 टक्के क्षमतेने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. धार्मिक स्थळे राज्य शासनाने जारी केलेल्या कोरोना नियमांचे पालन करून उघडण्यास परवानगी 7 ऑक्टोबर पासून देण्यात आली आहे.

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे राज्य सरकारने अनेक गोष्टी अनलॉक केल्या आहेत. शाळा, धार्मिकस्थळे सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानंतर 22 ऑक्टोबरनंतर थिएटर आणि नाट्यगृहे सुरु होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती. सिने-नाट्यगृहे कधी सुरु होणार अशी चर्चा गेले अनेक दिवस सिने-नाट्यवर्तुळात होत होती. सिनेमाप्रेमीदेखील कधी थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहता येईल याची वाट बघत होते. तर नाट्यप्रेमी त्यांच्या लाडक्या तिसऱ्या घंटेचा आवाज कानात कधी घुमणार याची प्रतिक्षा करत होते. यासंदर्भात सविस्तर कार्यपध्दती एसओपी तयार करणयाचे काम सुरु असून ती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. शाळा सुरु करण्यास शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे परवानगी मागितली होती. त्यामुळे पुढील महिन्यात शाळेची घंटा वाजणार आहे. त्यानुसार आता ग्रामीण भागात पाचवी ते बारावी तर शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरु होणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. शाळा सुरु करण्याअगोदर शिक्षक आणि पालकांना प्रशिक्षण देणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले आहे.

दरम्यान काल दिवसभरात मुंबईत 418 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 360 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत मुंबईत 7,19,992 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर गेल्या 24 तासात मुंबईत सहा रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4810 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1159 दिवसांवर गेला आहे.