केंद्रीय सप्टेंबर महिन्याच्या वेतनासोबतच डबल बोनस मिळण्याची शक्यता


नवी दिल्ली – मागील दीड वर्षांमधील महागाई भत्त्यावरील थकबाकी केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना दिलेली नाही. पण केंद्रीय कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्याच्या वेतनामध्ये मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्याच्या वेतनासोबतच डबल बोनस सरकारी कर्मचाऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेतन दिले जाते. त्यामुळेच केंद्रीय कर्मचाऱ्यांना ही आनंदाची बातमी आजच मिळण्याची शक्यता आहे. वाढलेला महागाई भत्ता आणि एचआरएसहीत सप्टेंबरचे वेतन हे येणार असल्यामुळे दिवाळी आधीच केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी साजरी होणार आहे. लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन सरकारने २८ टक्के केली आहे, तसेच केंद्राने घरभाड्यामध्ये मोठी वाढ केली आहे.

महागाई भत्त्यावरील स्थगित उठवण्याचा निर्णयाला सरकारने जून महिन्यामध्ये संमती दिली होती. तसेच कर्मचाऱ्यांच्या डीएचा मार्ग मोकळा करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकरी कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या आधारावर घरभाडे आणि डीए म्हणजेच महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याचे आदेश केंद्राने जारी केले होते. डीए २५ टक्क्यांपेक्षा अधिक होत असल्यामुळे नियमांनुसार एचआरए वाढवण्यात आला आहे. एचआरए २७ टक्के करण्याचा निर्णय केंद्राने घेतला.

जून महिन्यामध्ये २६ आणि २७ तारखेला दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक येथे झालेल्या बैठकीनंतर यासंदर्भातील माहिती केंद्रीय कर्मचारी युनियनचे महासचिव शिव गोपाल मिश्रा यांनी दिली. महासचिव शिव गोपाल मिश्रा यांच्यासह केंद्रीय सचिव आणि इतर नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या २८ महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली होती. याच बैठकीत केंद्र सरकारने कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून स्थगित केलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा महागाई भत्ता आणि पेन्शनर्सना देण्यात येणाऱ्या मदतीसंदर्भात चर्चा करण्यात आली होती.

शिव गोपाल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यात दोन महिन्यांच्या थकबाकीसह सरकार डीए देणार आहे. सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या पगारात महागाई भत्ता (डीए) आणि डीआर देण्यास सरकारने सहमती दर्शविली आहे. सरकार केंद्रीय हफ्ते आणि निवृत्तीवेतनधारकांना तीन हफ्त्यांचे डीए आणि डीआर देईल. हे तीन हफ्ते जानेवारी २०२०, जुलै २०२० आणि जानेवारी २०२१ मधील असतील, असे सांगितले होते. मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार जुलै आणि ऑगस्ट २०२१ साठी थकबाकीही देण्यात येणार असून, सप्टेंबरमध्ये ही रक्कम कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. केंद्रीय सचिवांनी अशी हमी दिल्याचे मिश्रा म्हणाले होते. त्याच निर्णयानुसार आता सप्टेंबरच्या वेतनासोबत ही रक्कम दिली जाणार आहे.

सप्टेंबर महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव पगार मिळाल्यास निवृत्ती वेतनधारकांना पेन्शन वाढून मिळणार आहे. सध्याच्या नियमानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना १७ टक्के दराने डीए मिळत होता. तर जानेवारी २०१९ मध्ये तो २१ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आला होता. परंतु मागील वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारने डीए आणि डीआरला स्थगिती दिली होती. सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे निश्चित करते. महागाई दरानुसार, डीए जूनमध्ये २४ टक्के आणि डिसेंबर २०२० मध्ये २८ टक्के निश्चित करण्यात आला होता. तर जुलै २०२१ मध्ये तो ३१ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता.

७ व्या वेतन आयोगांतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या १७ टक्के महागाई भत्ता मिळतो. शेवटच्या तीन वेळच्या महागाई भत्त्यांची एकत्र बेरीज केल्यानंतर ती २८ टक्के होणार आहे. यामध्ये जानेवारी २०२० मध्ये महागाई भत्त्यामध्ये ४ टक्के वाढ करण्यात आली, त्यानंतर दुसऱ्या सहामाहीत म्हणजेच जुलै २०२० मध्ये ३ टक्के वाढ झाली आणि जानेवारी २०२१ मध्ये त्यामध्ये ४ टक्के वाढ झाली आहे. आता जुलै २०२१ मध्येही त्यात ३ टक्क्यांनी वाढ झाली तर केंद्रीय कर्मचार्‍यांना सप्टेंबरपासून ३१ टक्के महागाई भत्ता (१७ + ४ + ३ + ४ + ३) मिळेल. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३१ टक्के दराने डीए मिळू शकतो, असे सांगण्यात आले आहे.

शिवगोपाल मिश्रा यांनी जुलै महिन्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या वर्ग १ मधील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची थकबाकी ११,८८० ते ३७,५५४ रुपये असेल. जर स्तर -१३ म्हणजेच ७ व्या सीपीसीची मूलभूत वेतनश्रेणी १,२३,१०० वरुन २,१५,९०० रुपये किंवा १४ व्या स्तरासाठी मोजली गेली तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची थकबाकी १,४४,२०० ते रू. २,१८,२०० रुपयांपर्यंत मिळू शकते.