राज्यात सर्वांना एकाच निकषावर एकसमान मदत करणार – छगन भुजबळ


नाशिक : राज्यात सर्वत्र अतिवृष्टी होत असून मोठ्या प्रमाणावरचे क्षेत्र पूरग्रस्त झाले आहे. राज्यात सर्वच ठिकाणी एकाच निकषावर पूरग्रस्तांना समसमान मदत करण्याचा शासनाचा प्रयत्न असून कुणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घेवून पूरग्रस्तांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

ते आज लासलगाव परिसरातील व्यापारीशेड, लासलगाव ग्रामीण रुग्णालय कर्मचारी निवासस्थान तसेच भरवस फाटा येथे पूरग्रस्त भागाची पाहणी करतांना नागरीकांशी संवाद साधतांना बोलत होते. यावेळी मुंबई बाजार समितीचे संचालक तथा लालसगावचे सरपंच जयदत्त होळकर, येवला बाजार समितीचे प्रशासक सभापती वसंत पवार, लासलगाव बाजार समितीचे संचालक नंदकुमार डागा, संदिप दरेकर, प्रांतअधिकारी डॉ. अर्चना पठारे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ, हरश्चिंद्र भवंर, गुणवंत होळकर, पांडुरंग राऊत, विकास चांदर, मधुकर गावडे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना पालकमंत्री भुजबळ म्हणाले, आताच पूरग्रस्त कांदा व्यापारी शेड भेट दिलीअसनू तेथे 700 क्विंटल कांद्याचे नुकसान झाले आहे. एकट्या निफाड तालुक्यात 110 मिलीमिटर इतका पाऊस झाला असून 47 गावे अतिवृष्टिने प्रभावित झाली आहेत.

यासंदर्भात सर्वांना एकसमान निकषावर आधारीत मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याशी चर्चा सुरू असून शक्य तितक्या लवकर पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी तात्काळ पंचानामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले. यावेळी लासलगाव ग्रामीण रुग्णालयात भेटी प्रसंगी रुग्णवाहिकेचे लोकार्पण पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.