जागतिक हृदय दिवस- करोनामुळे हृदयरोगातील वाढ चिंताजनक

जागतिक हृदय दिवस म्हणून २९ सप्टेंबर हा दिवस जगभर साजरा केला जातो. माणसाच्या शरीरातील अतिशय नाजूक तरी शक्तिशाली असा हा अवयव. अविश्रांत काम करणारा. पण तरीही माणसाकडून पुरेशी काळजी न घेतली जाण्याचे भोग वाट्यास आलेला असा हा अवयव. हृदय स्वस्थ ठेवण्यासाठी काय करावे आणि हृदयरोगाविषयी जागृती करण्याच्या उद्देशाने जागतिक हृदय दिवस साजरा होतो.

जगाला व्यापून राहिलेल्या करोनाचा विळखा अजून सुटलेला नाही मात्र करोना बाधित लोकांमध्ये हृदयाचे विकार मोठ्या प्रमाणावर वाढले असल्याचे दिसून आले आहे. करोना मधून बरे झालेल्या अनेकांच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्याचे दिसले आहे. अर्थात हृदय रोग होण्यामागे अनेक कारणे आहेत. अनियंत्रित जीवनशैली, अमली पदार्थ, सिगरेट सेवन, व्यायामाचा अभाव, ताण अशीही अनेक कारणे दिली जात असली तरी पूर्वी वयाने अधिक असलेल्या नागरिकात आढळणारा हृदय रोग आता मात्र तरुण वर्गात सुद्धा आढळू लागला आहे.

करोना उपचारात हृदयावर काही परिणाम होतो हे सुरवातीला लक्षात आले नव्हते. त्यातच लॉकडाऊन काळात अनेक हृदय रोगी उपचार घेऊ शकले नव्हते, वेळेवर औषधे मिळू शकली नव्हती. कोविडच्या गंभीर अवस्थेतील रुग्णांना जी औषधे दिली गेली त्याचा दुष्परिणाम हृदयावर होतो असे नंतर स्पष्ट झाले.

भारताचा विचार करायचा तर हृदयरुग्णांच्या एकूण संखेतील ५० टक्के रुग्ण ५० वर्षाखालील आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारी नुसार दरवर्षी जगात १.७८ कोटी लोक हृदयविकाराने मरतात. भारतात हा आकडा वर्षाला ३० लाख आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही