मुख्यमंत्र्यांच्या पुढे आमचे काही चालत नाही – अजित पवार


मुंबई – आज जागतिक पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नाराजी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अजित पवार यांनी थेट बोलण्याचा स्वभाव असल्यामुळे आपली नाराजी बोलून दाखवली. अजित पवार यांच्यासह सर्वच उपस्थितांना कार्यक्रमातील निवेदिकेच्या सूचनांमुळे वारंवार खुर्चीवरुन उठ-बस करावी लागल्यामुळे याबाबत भाषणाच्या सुरवातीला अजित पवार यांनी मिश्किलपणे नाराजी व्यक्त केली.

मी सुरुवातीपासून बारकाईने बघत आहे. एवढ्या वेळा मुख्यमंत्र्यांना एका निवेदिकेने बसा-उठा करायला लावले. मुख्यमंत्री उठायचे त्यामुळे आम्हाला सुद्धा उठावे लागत होते आणि बसावे लागत होते. एकदाचं सांगितले असते तर सर्व संपले असते. पण तुमच्या हातात माईक असल्यामुळे आम्हाला काही बोलता येत नाही. अन् मुख्यमंत्र्यांच्या पुढे आमचे काही चालत नसल्याचे अजित पवार म्हणाले.

अजित पवार पुढे म्हणाले, सर्वांगीण विकासासाठी पर्यटन ही संकल्पना, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन आजचा पर्यटन दिन साजरा करण्यात येत आहे. राज्यातील पर्यटनाचे अनेक फोटोग्राफर्सनी छान फोटो काढले. ते फोटो बघून महाराष्ट्रात खूप काही आहे, हे समजते. एवढी सुंदर फोटोग्राफी आहे की बोलायला शब्द अपूरे पडतात. जे चांगले आहे त्याचे महाराष्ट्र नेहमीच कौतुक करत असतो.

राज्यात मास्टर शेफ कार्यक्रम झाला, यातील विजेत्यांना पारितोषक दिली, पण त्यांनी थोडी तरी चव दाखवली असती, तर आम्हाला पटले असते, अशी मिश्किल टीपण्णी देखील यावेळी अजित पवार यांनी केली. राज्यामध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती उद्योगांमध्ये वाढ, रोजगाराची संधी, राज्याचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकास अशा अनेक गोष्टी पर्यटन विकासाच्या वतीने पुढे नेणे शक्य आहे. त्यामुळे या महत्वाच्या खात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे यांना दिल्याचे अजित पवार म्हणाले.