पैठण तालुक्यातील रस्ते, पुलांच्या कामासाठी प्राधान्याने निधी दिला जाईल – अशोक चव्हाण


औरंगाबाद :- पैठण तालुक्यातील रस्ते, पुलांच्या कामासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. प्राधान्याने या तालुक्यासाठी निधी दिला जाईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

पैठण तालुक्यातील टाके डोणगाव-विहामांडवा-तुळजापूर रस्त्याच्या रुंदीकरणासह सुधारणा कामाचे भूमिपूजन चव्हाण यांच्या हस्ते आज झाले. या निमित्ताने विहामांडवा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मिनाताई शेळके, माजी राज्यमंत्री अनिल पटेल, माजी आमदार सर्वश्री डॉ. कल्याण काळे, नामदेव पवार, संजय वाघचौरे, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग औरंगाबादचे मुख्य अभियंता दिलीप उकीर्डे, अधीक्षक अभियंता अनिल कुलकर्णी आदी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले की, गोदावरी खोऱ्यातील पाण्याची तूट भरुन काढण्यासाठी कोकणातील समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याकरीता निश्चितपणे प्रयत्न केला जाईल. वॉटरग्रीडच्या माध्यमातून जायकवाडी धरणातून पैठण तालुक्यातील गावांना शुध्द पाणीपुरवठा केला जाईल. वारकऱ्यांच्या सोयीसाठी पैठण-पंढरपूर या पालखी मार्गाची दुरुस्ती केली जाईल.

तसेच या मार्गावरील गोदावरी नदीवर पुल बांधण्यासाठी अर्थसंकल्पात 20 कोटी रुपयांची तरतूद केली जाईल. आज भूमिपूजन करण्यात आलेला डोणगाव-विहामांडवा-तुळजापूर या रस्त्याचा जास्तीत जास्त भाग सिमेंट कॉक्रींटचा तयार करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिली जाईल, त्यासाठी अधिकचा निधी देण्यात येईल. पैठण प्राधिकरणाला अधिकचा निधी मिळून देण्यासाठीही निश्चित प्रयत्न केला जाईल, जेणेकरुन विकासाची उर्वरित कामे पूर्ण करता येतील. पैठण येथील उद्यान जागतिक स्तराचे करण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

भुमरे म्हणाले की, विहामांडवा हे बाजारपेठेचे गाव आहे, रस्त्यासाठी या गावाला मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाल्यामुळे या गावच्या विकासात भर पडणार आहे. येत्या काळात वॉटरग्रीडच्या माध्यमातून पैठण तालुक्यातील गावांना शुद्ध पाणीपुरवठा मिळणार आहे, ही निश्चितच कौतुकाची बाब आहे. तसेच मातोश्री पाणंद रस्ते योजनेतंर्गत शेतात जाण्यासाठी दर्जेदार रस्ते निर्मिती केली जाईल.

औरंगाबाद-पैठण हा रस्ता चारपदरी करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. येत्या काळात मोसंबीच्या साठवणुकीसाठी पाचोड येथे लवकरच कोल्ड स्टोरेज सुरु होणार आहे. त्याचप्रमाणे पैठण येथे मोसंबीचे क्लस्टर सुरु करण्यात येणार आहे. बिडकीन येथे पाचशे एकरमध्ये फुडपार्कची उभारणी करण्यात येणार आहे. पैठण तालुका अधिक सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी पटेल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक उकीर्डे यांनी केले.

मराठवाड्यातील रस्ते दर्जेदार करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी काळी माती असल्यामुळे या ठिकाणचे सर्व रस्ते सिमेंट कॉक्रीटचे करण्यावर भर दिला जाईल. हे रस्ते दर्जेदार केले जातील. महत्त्वाचे म्हणजे मराठवाड्याचा सर्वांगिण विकास होण्यासाठी या विभागाला झुकते माप दिले जाईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

औरंगाबाद तालुक्यातील शरणापूर, साजापूर, पंढरपूर, नक्षत्रवाडी सिमेंट काँक्रीटीकरण रस्ता व शरणापूर, साजापूर रस्ता (वडगाव रस्ता ते सैलानी बाबा चौक) रुंदीकरणासह चौपदरी सिमेंट रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन चव्हाण यांच्या हस्ते आज झाले. या निमित्ताने करोडी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार इम्तियाज जलील, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार अंबादास दानवे, महामंडलेश्वर परमानंद गिरी महाराज, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग औरंगाबादचे मुख्य अभियंता दिलीप उकीर्डे आदी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले की, मराठवाडयाच्या विकासासाठी अर्थसंकल्पात भरघोस निधी मिळण्याकरीता प्रयत्न केला जाईल. त्याचप्रमाणे औरंगाबाद जिल्ह्याचा विकास अधिक गतीमान करण्यासाठी या जिल्हयाला अग्रक्रमाने निधी दिला जाईल. उदयोग व पर्यटनामुळे औरंगाबाद जिल्हयात विशेषत: औरंगाबाद शहरात वाहतुक वाढली आहे. तसेच शहराची व्याप्तीही वाढल्याने रस्ते अधिक दर्जेदार केले जातील.

अर्थसंकल्पात औरंगाबाद जिल्ह्याकरीता पंधराशे सहा कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. यातून रस्त्यांची अनेक कामे मार्गी लागत आहेत. पुढच्या दोन वर्षात जिल्ह्यात पुलांची व रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण केली जाणार आहेत. मिटमिटा ते हर्सुल रस्त्याच्या कामातही लक्ष घातले जाईल. लोकांनी मागणी केलेल्या कामाला प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

खासदार जलील म्हणाले की, औरंगाबाद जिल्ह्यात चांगले रस्ते होत आहेत, ही आनंदाची बाब आहे. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न केला जाईल. करोडी येथे क्रीडा विदयापीठ आणण्याची त्यांनी यावेळी मागणी केली. आमदार संजय शिरसाट म्हणाले की, करोडी येथे सर्व सुविधा दिल्या जात आहेत. येथील चारपदरी रस्ता एक वर्षाच्या आत पूर्ण केला जाईल. आमदार दानवे म्हणाले की, जिल्हयात मोठया प्रमाणात महामार्गांची कामे मार्गी लागत आहेत. विकासाच्यादृष्टीने जिल्हा प्रगती करीत आहे. शासनाने मिटमिटा ते हर्सुल रस्त्याचे काम मंजूर करावे, असेही ते म्हणाले.