जागतिक पर्यटन दिवस- करोना काळात असे करा सुरक्षित पर्यटन

२७ सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिवस म्हणून साजरा होतो. हा दिवस साजरा करण्याची सुरवात १९७० मध्ये झाली आणि विशेष थीम ठेऊन हा दिवस साजरा होतो. यंदाच्या वर्षासाठी ‘टुरिझम फोर एक्स्क्लूझीव ग्रोथ’ ही थीम आहे. करोना काळात पर्यटन व्यवसायाला फार मोठे नुकसान सोसावे लागले आहे. जगातील अनेक देशात पर्यटन हेच महसूल मिळविण्याचे मुख्य साधन असल्याने या देशांच्या अर्थव्यवस्था करोना काळात डबघाईला आल्या आहेत. जगभरात या क्षेत्रात रोजगार करणाऱ्यांची संख्या मोठी आहे आणि हा वर्ग आणि क्षेत्र जिवंत राहिले पाहिजे म्हणून ही थीम यंदा घेतली गेली आहे.

भारतात बहुतेक सर्व राज्यात लॉकडाऊन उठविला गेला आहे. तरी पर्यटनाला जायचे ठरविले तरी धोका आहेच. पण काही विशेष काळजी घेऊन सुरक्षित पर्यटन सहज शक्य होऊ शकणार आहे आणि घरात बसून उबगलेल्या लोकांना पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे.

सर्वात पहिली काळजी म्हणजे कोविड लस घेतलेली असावी. भारतातील अनेक राज्यात आणि विदेशात जाताना लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच काही ठिकाणी करोना निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक आहे. त्यामुळे पर्यटनाला निघताना ही कागदपत्रे बरोबर ठेवायला हवीत.फक्त कंटाळा घालविण्यासाठी बाहेर प्रवास करायचा असेल तर घरापासून जास्त दूर जाण्याचा विचार नको तसेच ज्या ठिकाणी जायचे आहे तेथे करोना पेशंटचे प्रमाण किती आहे याची महिती अगोदर घ्यावी आणि जेथे गर्दी कमी आहे असे ठिकाण निवडण्यास प्राधान्य द्यावे.

बस किंवा रेल्वे प्रवास या ऐवजी पर्यटन स्थळ स्वतःची कार नेता येईल इतक्या अंतरावर असले तर घरच्या कारनेच प्रवास केल्यास अन्य लोकांशी संपर्काचा धोका कमी करता येईल. प्रवासात बाहेरचे खाणे शक्यतो टाळा आणि वेळोवेळी सॅनीटायझरचा वापर करा. पुरेसे पाणी बरोबर ठेवा. विमानात पीपीई किट घालून प्रवासाची परवानगी आहे.शिवाय विमानात विशेष काळजी घेतली जाते. कमी वेळात संबंधित ठिकाणी पोहोचता येते त्यामुळे शक्य आहे तेथे विमान प्रवासाचा विचार नक्की करा. पर्यटन स्थळी मास्क, ग्लोव्हज वापर हवाच.

कॅम्पिंग, ट्रेकिंगला जाणार असला तर त्या ठिकाणचे कोरोना नियम काय आहेत याची अगोदरच माहिती करून घ्या. हॉटेल बुक करताना तेथे काय काय सुविधा आहेत याची माहिती घेऊन मगच बुक करा. अशी काळजी घेतली तर सुरक्षित पर्यटन सहज शक्य आहे.