नवी दिल्ली – वाढत्या महागाईमुळे मेटाकुटीस आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आणखी एक झटका मिळण्याची शक्यता आहे. कारण घरगुती एलपीजी सिलेंडर पुढील काही दिवसांत महागण्याची शक्यता आहे. एलपीजी सिलेंडरसाठी ग्राहकांना १००० रुपये मोजावे लागू शकतात. त्याचबरोबर एलपीजी सिलेंडरवर मिळणारे अनुदानही सरकार रद्द करण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने केलेल्या अंतर्गत मूल्यांकनात एलपीजी सिलेंडरसाठी ग्राहक १००० पर्यंत पैसे मोजण्यास तयार असल्याचे समोर आले आहे. पण याबाबत अद्याप केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती दिली आहे.
आता बोंबला! हजाराच्या घरात जाऊ शकतो एलपीजी सिलेंडर; अनुदानही रद्द होण्याची शक्यता
रिपोर्टनुसार, सरकार एलपीजी सिलेंडरच्या अनुदानासंबंधी दोन भूमिका घेण्याची शक्यता आहे. यानुसार सरकार सध्याच्या योजनेत कोणतेही बदल करणार नाही किंवा उज्ज्वला योजनेंतर्गत आर्थिकदृष्या सक्षम नसणाऱ्या ग्राहकांनाच अनुदान देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. पण सरकारकडून याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही.
सरकारने आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये अनुदान म्हणून ग्राहकांना ३५५९ कोटी रुपये दिले होते. २०१९-२० मध्ये खर्चाचा हा आकडा २४ कोटी ४६८ एवढा होता. म्हणजेच सरकारने एका वर्षात अनुदानामध्ये सहा पटीने कपात केली आहे. सध्याच्या नियमानुसार, तुमचे वार्षिक उत्पन्न जर १० लाखांपेक्षा जास्त आहे, तर तुम्हाला एलपीजी सिलेंडरवर अनुदानाची सुविधा मिळणार नाही. मे २०२० मध्ये काही ठिकाणी अनुदान बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
१ जानेवारीला दिल्लीमध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत ६९४ रुपये होती. आता सिलेंडरची किंमत ८८४ रुपेय ५० पैसे आहे. म्हणजेच जानेवारीपासून आतापर्यंत सिलेंडरच्या किंमतीत १९० रुपये ५० पैशांची वाढ झाली आहे. गेल्या साडे सात वर्षात घरगुती गॅल सिलेंडरची (१४.२ किलो) किंमत दुपटीने वाढली आहे. मार्च २०१४ ला १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ४१० रुपये ५ पैसे होती, जी आता ८८४ रुपये ५० पैसे आहे. भारतात जवळपास २९ कोटी लोकांकडे एलपीजी कनेक्शन आहे. यामध्ये उज्ज्वला योजनेंतर्गत येणाऱ्यांची संख्या आठ कोटींच्या आसपास आहे.