मोदींनी घेतली ५ बड्या कंपनी सीईओंची भेट

अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच बड्या कंपन्याच्या सीईओ बरोबर चर्चा करून भारतात असलेल्या आर्थिक संधींबद्दल माहिती दिली. रिन्यूएबल एनर्जी, सोफ्टवेअर डेव्हलपमेंट, आयटी, डिफेन्स आणि गुंतवणूक क्षेत्राशी संबंधित असलेल्या या कंपन्या आहेत.

अॅडोबचे शांतनु नारायण, जनरल अॅटॉमिक्सचे विवेक लाल, क्वालकॉमचे क्रिस्तियानो अमोन, फर्स्ट सोलरचे मार्क विडमार आणि ब्लॅकस्टोनचे स्टीफन श्वार्जमन यांचा त्यात समावेश असून या सर्व कंपन्या जगभर प्रचंड मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करत आहेत. भारताच्या विदेश मंत्रालयाने ट्विटर वरून या संदर्भात माहिती दिली आहे.

अॅडोबच्या नारायण यांच्याबरोबर भारतात कंपनीची आगामी गुंतवणूक तसेच आरोग्य, शिक्षण व संशोधन विकास या विषयावर बोलणे झाले आहे. १९८२ साली स्थापन झालेली ही सर्वात मोठी अमेरिकन सोफ्टवेअर कंपनी असून भारतात तिची नॉएडा, बंगलोर आणि गुरुग्राम येथे कार्यालये आहेत. क्वालकॉमचे एमोन यांनी भारतात फाईव्ह जी, डिजिटल इंडिया क्षेत्रात काम करण्याची इच्छा मोदींना बोलून दाखविली आहे.

सोलर पॉवर फर्म, फर्स्ट सोलरचे सीईओ मार्क यांनी भारतात सोलर पॉवर सेक्टरमध्ये रुची दाखविली आहे तर ब्लॅकस्टोन इन्व्हेस्टमेंट पेन्शन फंड, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करणार आहे. जनरल अॅटॉमिक्स ही अमेरिकन कंपनी उर्जा आणि रक्षा क्षेत्रात काम करते.