मुंबई : टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपच्यावतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘द मशिनिस्ट सुपर शॉपफ्लोर’ पुरस्कार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना प्रदान करण्यात आला. मुंबईतील वांद्रे येथील हॉटेल ताजमध्ये झालेल्या सोहळ्यात देसाई यांचा गौरव करण्यात आला. यावेळी विविध कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक आदी उपस्थित होते.
उद्योगमंत्री सुभाष देसाई टाइम्स ग्रुपच्या ‘द मशिनिस्ट सुपर शॉपफ्लोर’ पुरस्काराने सन्मानित
पुरस्काराला उत्तर देताना उद्योगमंत्री देसाई म्हणाले, कोरोना संकटकाळात उद्योगचक्र गतिमान ठेवण्यात उत्पादन क्षेत्राचा मोठा वाटा राहिला. उत्पादन क्षेत्रातील जाणकारांच्या सूचनांचा विचार करून राज्य शासन नवनवीन धोरणे ठरवत आहे. त्यामुळेच मागील काही दिवसांत राज्यात सुमारे दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. त्यातून सुमारे तीन लाख जणांना रोजगाराची संधी मिळणार आहे.
उद्योगक्षेत्राने राज्य शासनावर दाखविलेल्या विश्वासामुळे हे शक्य झाले. जगाची गरज ओळखून उद्योगक्षेत्रात क्रांतीकारक बदल घडत आहेत. ते स्वीकारून राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे देसाई यांनी सांगितले. या सोहळ्यादरम्यान विविध कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत परिसंवाद झाला.