राज्य सरकारचा महिला पोलीस कर्मचाऱ्यांसंदर्भात मोठा निर्णय ; ड्युटीच्या तासात कपात


मुंबई – राज्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी महाविकास आघाडी सरकारकडून एक महत्वपूर्ण व दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे कामाचे तास आता कमी करण्यात आले असून, आता त्यांना १२ ऐवजी ८ तासांची ड्युटी करावी लागणार आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास महाराष्ट्र सरकारने १२ तासांवरून ८ तास करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे डीजीपी संजय पांडे यांनी दिली आहे.

दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने महिला पोलीसांची ड्युटी बारा तासांहून आठ तासांची करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अतिशय चांगला निर्णय असून यामुळे अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यांना कुटुंब आणि नोकरी यामध्ये उत्तम असा ताळमेळ साधता येणे शक्य होणार आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह संपूर्ण मंत्रीमंडळाचे मनापासून आभार, असे म्हटलं आहे.

वारंवार ८ तासांची ड्युटी करण्यात यावी, अशी मागणी पोलीस विभागात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होती. या मागणीचा विचार करत पोलीस महासंचालक यांच्या सूचनेनुसार पुणे ग्रामीणमधील महिला पोलीस कर्मचाऱ्यांची ८ तासांच्या ड्युटी या अगोदर प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आलेली आहे. पुणे ग्रामीण अधीक्षक अभिनव देशमुख यांनी याबाबत माहिती दिली होती.