अनंत गीतेंनी पवारांबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर नारायण राणे म्हणतात…


मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सध्या राज्यातील राजकीय नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. एकीकडे शिवसेनेने अनंत गीते यांच्या वक्तव्यापासून फारकत घेतली असून दुसरीकडे राष्ट्रवादीने त्यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांच्या टीकेला अडगळीतले नेते असा उल्लेख करत उत्तर दिले आहे, दरम्यान अनंत गीतेंनी मांडलेला मुद्दा वास्तववादी चित्र असल्याचे सागंत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांची बाजू घेतली आहे. नारायण राणेंनी झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत यावर प्रतिक्रिया दिली.

अनंत गीतेंनी मांडलेला मुद्दा वास्तववादी चित्र असून पदांसाठीच शिवसेना आणि राष्ट्रवादीची तडजोड झाली आहे. हिंदुत्वाचा आणि निष्ठेचाही यामध्ये भाग नाही. शिवसेनेने तर मुख्यमंत्रीपदासाठी हिंदुत्त्वाला मूठमाती दिली. त्यामुळे शिवसेनेला हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही, अनंत गीतेंनी सांगितले ते १०० टक्के खरे असल्याचे नारायण राणे म्हणाले आहेत.

दरम्यान, गीते यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, यावर बोलताना राणे म्हणाले, अजून काय वाकडे करू शकतात. कदाचित गीते यांना फासावर लटकवतील. यांना दुसरे येते काय? अनंत गीतेंची जी अवस्था आहे, तीच अन्य शिवसैनिकांची आहे. त्यांना कोणीच विचारत नाही. अनंत गीतेंचे चुकते कुठे? अशी विचारणाही यावेळी त्यांनी केली.